‘त्या’ पार्टीतील युवकांना तीन दिवसांनंतर शुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:22 AM2018-05-17T06:22:15+5:302018-05-17T06:22:15+5:30
आरे परिसरात मृतावस्थेत आढळलेला अथर्व शिंदे ज्या ‘बर्थ डे’पार्टीत सहभागी होता, त्या ठिकाणी अमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता.
मुंबई : आरे परिसरात मृतावस्थेत आढळलेला अथर्व शिंदे ज्या ‘बर्थ डे’पार्टीत सहभागी होता, त्या ठिकाणी अमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. त्यामध्ये नशा केलेल्या युवकांना तब्बल ३ दिवसांनी शुद्ध आली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, पार्टीत वापरलेले ड्रग्ज कोणी व कोठून आणले, याची चौकशी सुरू असली, तरी अद्याप त्याचा उलगडा पोलिसांना करता आलेला नाही.
अथर्वच्या मृत्यूच्या कारणाच्या शोधाबरोबरच ड्रग्जबाबतही पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. पार्टीत एका मराठी चित्रपट निर्मात्याने त्याची मुलगी अठरा वर्षांची झाल्याने, ७ मे रोजी आरेतील रॉयल पाम बंगल्याच्या परिसरात जंगी पार्टी दिली होती. सर्व मित्र पार्टीत सहभागी झाले होते. मात्र, पार्टीतील ड्रग्जबद्दल काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे या पार्टीमध्ये ड्रग्ज नेमके कोणी पुरविले, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत. कारण अथर्वच्या मृत्यूनंतर ज्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यांना शुद्ध येण्यासाठी जवळपास तीन दिवस लागले.
जबाब देताना घटनेचे गांभीर्य जाणवत नव्हते. त्यावरून त्यांनी किती प्रमाणात नशा केली असेल याचा अंदाज येतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या पार्टीत सर्व प्रकारचे अमली पदार्थ उपलब्ध होते, हेदेखील या मुलांच्या जबाबातून उघड झाले आहे.