कांदिवली येथील कोविड १९ने मृत्यू झालेल्या तरुणाची नोंद अद्याप नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:56 AM2020-04-27T01:56:07+5:302020-04-27T01:56:21+5:30
कोविड १९ने मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्याप महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप आमदार कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे.
मुंबई : कांदिवली पूर्व मतदारसंघातील श्रीरामनगर भागातील ३२ वर्षांच्या तरुणाचा कोविड १९ने मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्याप महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप आमदार कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे. कोविड १९मुळे होणारे मृत्यूचे आकडे लपवण्याकरताच हा प्रकार आणि अक्षम्य हलगर्जीपणा जाणीवपूर्वक केला आहे, असा आरोप त्यांनी आपल्या या पत्रात केला आहे. २० एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता या तरुणाचा कोविडमुळे मृत्यू झालेला असतानासुद्धा अद्याप याच्यानंतर जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे कुठलीही पावले उचलणे सोडाच, पण कालपर्यंत त्याच्या मृत्यूची माहिती तो राहत असलेल्या आर साऊथ वॉर्डातल्या अधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमधून कळवली गेली नव्हती. त्यामुळे हा तरुण ज्या वस्तीत राहत होता त्याच्याबरोबर संपर्कात आलेले इतर नागरिक व घरातले लोक आजही त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे या भागातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत आमदार भातखळकर यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केले आहे.
आता तरी तातडीने मृत व्यक्ती ज्या घरात ज्यांच्याबरोबर राहत होती त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात आपण तातडीने कार्यवाही करावी, तसेच यासंदर्भात हलगर्जीपणा करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी या पत्रात केली आहे.