Join us

तरुणाई मतदारांना देणार प्रोत्साहन

By admin | Published: January 08, 2017 2:27 AM

‘मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावा, सुट्टी म्हणून फिरायला जाऊ नका. तरुणाईनेही मतदानात सहभागी व्हा,’ अशी जनजागृती फेब्रुवारी महिन्यापासून महाविद्यालयीन

मुंबई : ‘मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावा, सुट्टी म्हणून फिरायला जाऊ नका. तरुणाईनेही मतदानात सहभागी व्हा,’ अशी जनजागृती फेब्रुवारी महिन्यापासून महाविद्यालयीन विद्यार्थी करणार आहेत. कॅम्पस आणि जवळच्या सोसायटीमध्ये जाऊन विविध माध्यमातून ही जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना ३०० महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.येत्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मुंबई विद्यापीठाने मतदानासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. २० महाविद्यालयांना सोसायटी दत्तक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनजागृतीसाठी शहरातील मुख्य ठिकाणी पदयात्रा काढल्या जाणार आहेत. एअर इंडिया इमारत ते गिरगाव चौपाटी, वरळी सी-फेस ते प्रभादेवी, नॅशनल महाविद्यालय ते वांद्रे स्थानक, मिठीबाई महाविद्यालय ते जुहू बीच या ठिकाणी पदयात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी पदयात्रेत सहभागी होऊन मतदानाविषयी जनजागृती करणार आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हुतात्मा चौक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, गर्दीच्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात मानवी साखळी करण्यात येणार आहे. लोकशाहीत मतदानाला महत्त्व आहे, पण गेल्या काही वर्षांत मतदानाचा टक्का घसरत आहे. लोक मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, फेबु्रवारी महिन्यापासून ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापरही केला जाणार आहे. या साइट्सवरून तरुणांना मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)