मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या काळा घोडा महोत्सवात प्रयोगशील नाट्यसंस्था ‘अस्तित्व’तर्फे नाट्यप्रयोग आणि मुंबई थिएटर गाईडच्या सहकार्याने तीन नाट्यविषयक उपक्रम होणार आहेत. यानिमित्ताने काळा घोडा महोत्सवात तरुणाईचा नाट्याविष्कार अनुभवण्यास मिळणार आहे.८ आणि ९ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता सिनेड्रामा म्हणजेच ‘अस्तित्व’ने मुंबई थिएटर गाईडच्या सहकार्याने राबवलेल्या ई-नाट्यशोध या उपक्रमांतर्गत ध्वनिचित्रमुद्रित केलेल्या एकांकिका प्रेक्षकांना पडद्यावर पाहता येतील. ८ फेब्रुवारीला श्रीपाद देशपांडे लिखित आणि सुनील हरिश्चंद्र दिग्दर्शित ‘मडवॉक’ तसेच संकेत तांडेल लिखित दिग्दर्शित ‘टेराडेक्टीलचे अंडे’ तर ९ फेब्रुवारीला वैभव चव्हाण लिखित दिग्दर्शित ‘रिदम आॅफ लव्ह’ तसेच अंकित गोर लिखित ‘आय वॉन्ट टू ट्विट’ ही गुजराती एकांकिका सादर होईल.अस्तित्व - सकस मुंबई प्रस्तुत ‘गोष्ट एका शाळेची’ या नाटकाचा प्रयोग १० फेब्रुवारीला रंगेल. या नाटकाचे लेखन संजय सावंत आणि विनोद जाधव यांचे असून, सुमित पवार यांनी ते दिग्दर्शित केले आहे. हे नाटक नॅशनल गॅलरी फॉर मॉर्डन आर्ट येथे सादर होईल. १३ फेब्रुवारीला अस्तित्व निर्मित ‘टिकल्या’ हा मराठीतील पहिलाच सिटकॉम आविष्कार सादर होणार आहे. रवी मिश्रा यांची संकल्पना असलेल्या या नाट्यप्रयोगाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे असून, नेत्रा अकुला, श्रद्धा म्हेत्रे, भावेश टिटवळकर आदी कलाकार हा प्रयोग रंगवणार आहेत. सेजल पोंडाच्या पीएच.डी. या नाटकाचे अभिवाचन १२ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता होईल. यंदाच्या ई-नाट्यसंहिता स्पर्धेत विजयी ठरलेल्या या संहितेचे अभिवाचन अभिनेते सनत व्यास आणि स्वत: सेजल पोंडा करणार आहेत. (प्रतिनिधी)
तरुणाईचा नाट्याविष्कार !
By admin | Published: February 08, 2016 2:56 AM