Join us

नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज!

By admin | Published: December 30, 2016 3:42 AM

मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘थर्टी फर्स्ट’ सेलीब्रेशनसाठी मुंबईकर तरुणाई सज्ज झाली असून, त्या अनुषंगाने विविध प्रकारचे नियोजन केले

मुंबई : मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘थर्टी फर्स्ट’ सेलीब्रेशनसाठी मुंबईकर तरुणाई सज्ज झाली असून, त्या अनुषंगाने विविध प्रकारचे नियोजन केले आहे. शहरातील हॉटेल्स, पब्स, बार मालकांनीही यासाठी कंबर कसली आहे. शिवाय, पार्टी आयोजकांनी ‘कॅशलेस’चा पर्यायही उपलब्ध करून दिल्याने नव्या वर्षाचे स्वागत दणक्यात होईल, यात शंका नाही.डीजेच्या संगीतावर खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई अधिक जोशात आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला ‘गुडबाय’ करून नवीन वर्षाचे वाजतगाजत स्वागत करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, स्वागतात वैविध्यही दिसून येते. कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट, जोडपे, युवक-युवतीसाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरेंटमध्ये व्यवस्था करण्यात आली. हॉटेल्स व बीअर बार मालकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी खास तयारी केली असून, आकर्षक सजावटीसाठी रात्री १२च्या ठोक्याला नववर्षाभिनंदन करणे, केक कापणे, फुलांचा वर्षाव असे कार्यक्रम राहणार आहेत. काही हॉटेल्स मालकांनी ग्राहकांच्या मागणीनुसार सोय करून देण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये कोणाला नृत्य, गायनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, कोणाला भलामोठा केक कापून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे, कोणाला विशेष खेळांचे आयोजन करायचे आहे अशा प्रकारे सर्व व्यवस्था केली आहे. तर दुसरीकडे सध्याची महागाई आणि नोटाबंदीचा मनस्ताप सहन करावा लागल्याने अनेकांनी इमारतीच्या गच्चीवरच थर्टी फर्स्ट सेलीब्रेशन करण्याची तयारी केली आहे.