तरुणांचे ‘बुरे’ दिन सुरू...

By admin | Published: March 1, 2016 02:59 AM2016-03-01T02:59:29+5:302016-03-01T02:59:29+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पात तरुण पिढीला उपयुक्त असणाऱ्या गॅझेट्स ते ब्रॅण्डेड कपडे अशा सर्वच वस्तू महागणार आहेत. शिवाय, या अर्थसंकल्पात सेवाकरातही वाढ केल्याने तरुण पिढी भलतीच नाराज आहे.

Youth's 'bad day' starts ... | तरुणांचे ‘बुरे’ दिन सुरू...

तरुणांचे ‘बुरे’ दिन सुरू...

Next

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात तरुण पिढीला उपयुक्त असणाऱ्या गॅझेट्स ते ब्रॅण्डेड कपडे अशा सर्वच वस्तू महागणार आहेत. शिवाय, या अर्थसंकल्पात सेवाकरातही वाढ केल्याने तरुण पिढी भलतीच नाराज आहे. सध्याच्या जमान्यात ‘स्मार्ट’ गॅझेट्सवर अवलंबून असणाऱ्या या पिढीने अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त करीत अर्थसंकल्पामुळे बऱ्याच गोष्टींवर बंधने येणार असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना मांडले आहे. त्यात हॉटेलिंग, मुव्ही तिकीट्सही महागणार असल्याने पॉकेटमनीचे वांदे होणार असल्याचेही तरुणाईचे मत आहे.
पॉकेटमनी जपून वापरावा लागणार
ब्रॅण्डेड कपडे आणि चपलांचे वेड सगळ्याच कॉलेज गोइंग मुलींना असते. पण यंदाच्या अर्थसंकल्पात यांच्या किमतीत वाढ होणार हे कळल्यावरच आता पॉकेटमनी जपून वापरावा लागणार आहे. याबरोबरच सर्व्हिस टॅक्सवाढीमुळे हॉटेलिंग करणेही जिवावर येणार आहे.
- काजल जाधव, कीर्ती कॉलेज (दादर)

पायरेटेड चित्रपटांकडे तरुणाई वळेल
मोबाइल आणि अन्य गॅझेट्सच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आपोआपच अनेक जण त्याकडे कमी आकर्षित होतील. शिवाय सिनेमांच्या तिकिटातही वाढ होणार आहे. म्हणजे सिनेमाला जाण्याचे प्रमाण कमी होऊन पुन्हा पायरेटेड चित्रपटांकडे तरुणाई वळेल आणि हल्ली अ‍ॅण्ड्राइड फोनवर चित्रपट रीलीज झाल्याच्या काहीच दिवसांत फोनवर पाहता येतात. त्यामुळे मोबाइलवरच सिनेमे बघण्याचे प्रमाण वाढेल.
- शुभम शिंदे, रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय (घाटकोपर)

खादाडीवर बंधने येणार
एखाद्या मैत्रिणीचा अथवा मित्राचा वाढदिवस असेल तर आधी हक्काने पार्टी मागितली जात होती. पिझ्झा आणि बर्गर या खाद्यपदार्थांवर असणाऱ्या सर्व्हिस टॅक्समुळे आधीच काही परवडत नाही. त्यात आता आणखी भर पडणार. मग काय बघायलाच नको. खादाडीवर बंधने येणार हे मात्र नक्की!
- ऋतुजा गोलतकर, रहेजा महाविद्यालय (वरळी)

थोडा गम थोडी खुशी
बजेटमधील गॅझेट्स महागाईमुळे आता पालक मोबाइल फोन देताना स्वत:चे बजेट ठरवणार. त्यामुळे नाइलाजाखातर ते देतील तो फोन, लॅपटॉप पदरात पाडून घ्यावा लागणार आहे. शिवाय यामुळे तरुणाईच्या वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे गम और खुशी दोनो भी असे काहीसे झाले आहे.
- पूर्वा कर्वे, मुंबई विद्यापीठ (सांताक्रूझ)पालकांच्या खिशाला कात्री लागणार
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी मोबाइल, कॉम्प्युटरसारख्या आवश्यक वस्तू अत्यावश्यक झाल्या आहेत. खरे तर विद्यार्थ्यांना या वस्तू सवलतीच्या दरात मिळायला हव्या. यात वाढ होणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आधीच महागाईने होरपळून निघणाऱ्या मध्यमवर्गीयांना या नव्या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल असे वाटत नाही.
- निहाल मोरे, वझे महाविद्यालय (मुलुंड)
महागाईमुळे मनस्ताप वाढेल
सध्या कॉम्प्युटर, लॅपटॉप या साऱ्याचीच आवश्यकता असते. आधीच मध्यमवर्गीयांचे पालक विद्यार्थ्यांना या साऱ्या गोष्टी घेऊन देतात. शिवाय दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे घर चालवणे कठीण झाले आहे. अर्थसंकल्पातील काही वस्तूंच्या महागाईमुळे मनस्ताप वाढेल
- सौरभ जाधव, बाळासाहेब म्हात्रे पॉलि. कॉलेज (बदलापूर)
वाढीव सेवाकराचा सर्वसामान्यांना फटका
गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून दिसून आला. शिवाय तंबाखूच्या किमती वाढवल्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाणार नाही. पण वस्तूंवरील सेवा कर वाढवल्यामुळे सर्वसामान्यांनाही याचा फटका बसेल. पण काळा पैसा सत्कारणी लागेल, अशी अपेक्षा आहे. गॅझेट्स महाग झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा नक्कीच आहे.- शुभम कांबळे, साठ्ये महाविद्यालय(विलेपार्ले)
पैशांची खरी किंमत कळेल
अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा महागाईचा भस्मासूर आला आहे, असे अनेक जण म्हणत आहेत. पण तरुणांसाठी ही महागाई प्रेरणादायक ठरणार आहे. मोबाइल फोन्स आणि अन्य गॅझेट्सच्या किमती वाढल्यामुळे कॉलेजिअन्समध्ये टॅबलेट, महागडे फोन घेण्याचे प्रमाण कमी होईल. शिवाय रोजचा दिवस दिलेल्या पैशात कसा घालवायचा, हे खऱ्या अर्थाने कळेल. चंगळ कमी होईल. काटकसरीची सवय आणि पैशाची खरी किंमत कळेल असे वाटते.
- प्रांजल वळुंज, झुनझुनवाला महाविद्यालय (घाटकोपर)
काटकसर करावी लागणार
गरिबांचा, शेतकऱ्यांचा विचार यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. चांगली गोष्ट आहे. शिक्षणासाठीही चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण गॅझेट्स, प्रवास, हॉटेलिंग हे सारे महागल्यामुळे ‘पॉकेटमनी’त काटकसर करावी लागणार आहे. किमान कॉम्प्युटर, लॅपटॉपसारख्या वस्तू स्वस्त करण्यात याव्यात. जेणेकरून साऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.
- राजन ठाकूर, निर्मला मेमोरिअल फाउंडेशन (कांदिवली)

Web Title: Youth's 'bad day' starts ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.