निर्णय न झाल्याने तरुणांनी केले मुंडन; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 05:15 AM2020-02-05T05:15:05+5:302020-02-05T05:15:32+5:30
मराठा उमेदवार आंदोलनाचा आठवा दिवस
मुंबई : मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस होता. मंगळवारी आठ तरुणांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. गेल्या ८ दिवसांपासून हे तरुण शासनाच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती व्हावी यासाठी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
आंदोलकांची आमदार नमिताताई मुंदडा यांनी मंगळवारी भेट घेतली व आंदोलनाला पाठिंबा दिला. याबाबत व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सोमवारी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, तरुणांनी उद्याच्या कॅबिनेट बैठकीत आमचा विषय घेऊन तो मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्ही आमचा लढा आणखी तीव्र करू, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.