मुंबई : विवाहित प्रेयसी लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने रोशन सावंत (२५) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री दहिसर येथे घडली. पतीपासून विभक्त रहात असलेल्या एका तरुणीशी गेल्या काही महिन्यांपासून त्याचे संबंध होते. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे तिने सांगितल्याने निराश होऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिनाभरापासून दोघे दहिसर येथे भाड्याची खोली घेऊन एकत्र राहत होते. रोशन सावंत हा काही महिन्यापूर्वी अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करीत होता. त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका २४ वर्षीय विवाहित तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तिचा पती कोकणात राहात असून, त्यांना सहा वर्षांची एक मुलगी आहे. पतीशी पटत नसल्याने ती तिच्या आईकडे मार्वे रोड येथे राहते. सध्या ती मालाडमध्ये मार्केटिंगचे काम करते. पतीपासून तिने घटस्फोट मागितला असून, हे प्रकरण कुटुंब न्यायालयात प्रलंबित आहे. घटस्फोट मिळाल्याशिवाय तुझ्याशी लग्न करणार नाही, असे तिने रोशनला सांगितले होते. तो मात्र, तिच्याशी लग्न करण्यास आतूर झाला होता, त्यावरून त्यांचात अनेकदा भांडणही होत. रोशनच्या भावानेच या प्रकरणी दोघांमध्ये मध्यस्थी करून भांडण मिटवले होते, तसेच घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करू नको, असेही बजावल्याने तो निराश झाला होता. ३१ डिसेंबरला दोघे अंधेरी येथे भेटल्यानंतर त्यांच्या पुन्हा लग्नाच्या विषयावरून वाद झाला. त्यावेळी तिने त्याला विरारच्या घरी जाण्यास सांगितल्याने, तो लोकलमध्ये बसून निघून गेला. काही वेळाने तिने त्याला फोन करून विचारले असता, वसईत उतरल्याचेही त्याने तिला सांगितले. त्यानंतर मात्र रोशनने बराच वेळ फोन उचलला नाही, त्यामुळे तरुणीने त्याच्या भावाला फोन करून चौकशी केली असता, तो घरी आला नसल्याचे त्याला समजले. त्यामुळे ती दहिसरमध्ये त्यांच्या घरी गेली, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. याबाबत तिने रोशनच्या भावाला कळवताच तो विरारहून तेथे आला. त्यांनी खिडकीतून डोकावून आत पाहिले असता, रोशनने गळफास घेतल्याचे उघड झाले. दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)
प्रेयसीच्या नकाराने तरुणाची आत्महत्या
By admin | Published: January 03, 2016 3:30 AM