अक्षय चोरगे/कुलदीप घायवट।मुंबई : आजकाल नागरिकांचा वाचनाप्रतिचा कल कमी होत आहे. अशा वेळी जागतिक पुस्तक दिनानिमित्त (२३ एप्रिल) वाचनापासून दूर झालेल्या लोकांनी पुन्हा वाचनाकडे वळण्याचा संकल्प करावा, अशी इच्छा अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. आपण वाचत राहिलो तरच वाचन संस्कृती टिकेल. त्यामुळे प्रत्येकाने दररोज काही क्षण तरी पुस्तकांच्या सहवासात घालवावे. मोबाइल आणि इंटरनेटच्या जगात वाचन संस्कृतीला उतरती कळा लागली आहे, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. काही प्रमाणात ते खरे आहे. मात्र, याला आपणच जबाबदार आहोत. आता परीक्षा संपून शाळांना सुट्या लागल्या आहेत. ही सुटी वाचनासाठी वापरावी. युवकांनी पुस्तकांकडे वळा, असा मोलाचा सल्ला देत, पालकांनीही मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन साहित्यिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.ओंजळ पुस्तकांनी भरण्याची गरजआंतरराष्ट्रीय शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मराठी भाषेच्या पुस्तकांपासून दूर जात आहेत. दुसरीकडे मॉल आणि पुस्तकांची दुकाने इंग्रजी पुस्तकांनी खच्चून भरली असतानाच खेड्यापाड्यातील मुलांच्या नशिबात छोटी पुस्तकेही नाहीत. म्हणून मुलांच्या हाती आपल्या भाषेतील पुस्तके देण्याची गरज आहे. जेथे पुस्तके नाहीत तेथे पुस्तके पोहोचविण्याची गरज आहे. अनेक छोट्या शाळांमध्ये ग्रंथालये नाहीत. तेथे ग्रंथालय उभे करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. एका अर्थाने आपली ओंजळ आता पुस्तकांनी भरण्याची गरज आहे.- डॉ. वीणा सानेकर, लेखिकाआजपासून करा वाचनाला प्रारंभपुस्तक दिनाचे गांभीर्य लोकांना अद्याप समजलेले नाही. आजच्या दिवशी सर्वांनी वाचन संस्कृती टिकवण्याचा मानस करूया. लहान मुलांना पुस्तके वाचून दाखवायला हवीत. असे केल्याने हळहळू ती मुलेदेखील पुस्तके वाचायला लागतील.- मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिकनेहमी पुस्तकांच्या सहवासात राहावेपुस्तक दिन हा केवळ एक दिवस नव्हे, तर दररोज साजरा व्हायला हवा. मी दररोज हा दिवस साजरा करतो. माझे वाचन आणि लिखाण नेहमीच सुरू असते. कधीही काहीही सुचले की, ते लगेच कागदावर उतरविण्याचे काम सुरूच असते. ‘ओळख असते सर्व जगाशी, परी स्वत:शी अनोळखी’ आज अचानक मला ही ओळ सुचली. मी ती लिहून ठेवली. या ओळीचे मी पुढे काय करेन माहीत नाही; परंतु आज मी काही तरी लिहिले, याचे समाधान आहे. पुस्तक दिनानिमित्त सर्वांनी वाचनाचा शुभारंभ करायला हवा.- अनिल अवचट, ज्येष्ठ साहित्यिकवाचणारी मुले लिहिती होतीलआंतरराष्ट्रीय पुस्तक दिनानिमित्त सर्व पालकांनी त्यांच्या मुलांसाठी नवी पुस्तके खरेदी करावी, अथवा ग्रंथालयातून घ्यावी. रात्री एखादे पुस्तक मुलांना वाचून दाखवावे. त्यामुळे हळूहळू ऐकणारी मुले वाचायला लागतील आणि वाचणारी मुले लिहिती होतील. मुले मोठी असतील तर त्यांना पुस्तके वाचायला द्यावीत. आजपासून वाचनाला सुरुवात करावी. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हायला हवी. फावल्या वेळात गृहिणींनीदेखील वाचन करायला हवे. वाचलेल्या पुस्तकांवर सर्वांनीच चर्चा करायला हवी. न वाचणाऱ्या लोकांना वाचनाची गोडी लावायला हवी. आजच्या पुस्तक दिनी असा संकल्प करूया की, वाचलेली पुस्तके रद्दीत न देता, वाचनालयास देऊ.- विजया वाड, ज्येष्ठ लेखिकापुस्तक दिनाची महती सर्वदूर व्हावीकेवळ एकच दिवस पुस्तक दिन नसतो. वर्षभर वाचन करून हा दिवस दररोज साजरा करायला हवा. आज पुस्तक दिन आहे, हे अनेकांना माहीत नसेल. त्यामुळे या दिवसाची महती सर्वदूर पसरायला हवी. सर्वांनी आजपासून वाचनाचा शुभारंभ करावा.- सुधीर महाबळ, साहित्यिकपुस्तक हे जगण्याचा अविभाज्य घटकज्याला वाचनाचा कंटाळा येतो, अशा व्यक्तीने किमान आजच्या दिनी तरी पुस्तक वाचावे. पुस्तक वाचून झाल्यावर त्यातील विचार इतरांसोबत मांडावेत. असे केल्यानेच पुस्तक वाचून सार्थक होईल. यातूनच समृद्ध जगण्याचा मार्ग मिळेल. मी रोज पुस्तकांच्या विश्वात असतो. त्यामुळे या दिवशी काही विशेष करत नाही. रोज दोन ते तीन पुस्तके वाचल्याशिवाय दिवस जात नाही. पुस्तक हे जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहे.- किरण येले, साहित्यिकप्रत्येकाने वाचन करावेपुस्तके ही ज्ञान, आनंद देणारी असतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाकडे भर दिला पाहिजे. यासाठी एकमेव उपाय म्हणजे पुस्तके विकत घेऊन वाचणे. काही जण म्हणतात, पुस्तके घेणे परवडत नाही, मात्र दुसरीकडे पैशांचा अपव्यय करतात. हे थांबले पाहिजे. माझ्यासाठी रोजच पुस्तक दिन असतो. लेखक असल्यामुळे दररोज पुस्तकांमध्ये असतो.- मकरंद साठे, साहित्यिकसोशल मीडियावरील ज्ञान ‘अर्धवट’सद्य:स्थितीत सोशल मीडियावरच्या ज्ञानावर बरेच जण विसंबून राहतात. मात्र, प्रत्येक वेळी ही माहिती खरी असेलच असे नाही. महापुरुषांच्या इतिहासातील वेगवेगळे दिशा आणि पैलूंचे अर्धवट ज्ञान येथे दिले जाते. त्यामुळे पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही; कारण पुस्तकांमधील ज्ञान हे शाश्वत ज्ञान आहे. सोशल मीडिया हे कच्चे ज्ञान देण्याचे माध्यम आहे. पक्के ज्ञान मिळवायचे असेल तर पुस्तकांकडे वळा. प्रत्येक जण पुस्तकांच्या संपर्कात राहिला, तर ती नक्कीच फायद्याची गोष्ट आहे. प्रत्येक विषयावर सखोल ज्ञान मिळविण्याचे एकमेव माध्यम पुस्तक हेच आहे.- हेमंत एदलाबदकर, पटकथा लेखक
युवकांनो... पुस्तकांकडे वळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:22 AM