Join us

युवक काँग्रेसचे महाराष्ट्रभर निषेधासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 5:26 AM

राज्यातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विडंबनात्मक योगासने करत राज्य सरकारचा निषेध केला.

मुंबई : राज्यातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विडंबनात्मक योगासने करत राज्य सरकारचा निषेध केला. भाजपा सरकारचा योगासनांवर ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्याच योगासनांच्या माध्यमातून सरकारकडून देण्यात आलेली फसवी आश्वासने आणि करण्यात आलेल्या घोटाळ्यांची माहिती या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आली.योगासनाच्या बारा प्रकाराच्या विडंबन आसनांच्या माध्यमातून राफेलासन, महागाई आसन, वाचाळासन, भक्तासन, क्लीन चिट आसन, ट्रोलासन, गाजरासन, मौनासन, धमकी आसन, बेरोजगारासन अशी विविध प्रकारची आसने करून सत्ताधारी सरकारचा बुधवारी निषेध करण्यात आला. आम्ही आजवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारला सामान्य जनतेच्या भावना कळायला तयार नाही. त्यामुळे सरकारला जी भाषा कळते, त्याच भाषेचा अवलंब करण्याचा निर्णय आम्ही घेण्यात आला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, ढेपाळलेली अर्थव्यवस्था हे कळीचे मुद्दे आसनांच्या माध्यमातून पुढे आणण्यात आले आहेत. त्यामुळे आता तरी सरकारला जनतेची व्यथा कळेल, अशी अपेक्षा आहे, असे सत्यजित तांबे यांनी छेडण्यात आलेल्या आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना सांगितले.नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख महानगरांसह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बुधवारी सरकारचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सोशल माध्यमांतून खोटे आरोप करणाºया आणि सोशल मीडियावरच अंधभक्त म्हणून प्रसिद्ध पावलेल्या भक्तांचाही भक्तासन घालून निषेध करण्यात आला.

टॅग्स :काँग्रेसभाजपामुंबईमहाराष्ट्र