कुर्ला रेल्वेस्थानकाच्या बाहेर युलू इलेक्ट्रिक बाइक सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:10 AM2021-02-20T04:10:47+5:302021-02-20T04:10:47+5:30
मुंबई : कुर्ला ते बीकेसी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुर्ला रेल्वेस्थानकाच्या बाहेर गुरुवारपासून युलू इलेक्ट्रिक बाइक सेवा सुरू करण्यात ...
मुंबई : कुर्ला ते बीकेसी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुर्ला रेल्वेस्थानकाच्या बाहेर गुरुवारपासून युलू इलेक्ट्रिक बाइक सेवा सुरू करण्यात आली. इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी बीकेसी परिसरात याआधीच इलेक्ट्रिक बाइक्सचा प्रकल्प राबवण्यात आला होता. बीकेसी येथे ३१ ऑगस्ट २०२० रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र आता मध्य रेल्वेच्या मुंबईतील प्रत्येक रेल्वेस्थानकाबाहेर इलेक्ट्रिक बाइक सेवा सुरू करण्याचा मानस असल्याने गुरुवारपासून कुर्ला रेल्वेस्थानकाबाहेर ही सेवा सुरू करण्यात आली. कुर्ला रेल्वेस्थानकावर प्रवाशांची नेहमी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यामुळे या परिसरात वाहनांचे प्रमाणदेखील अधिक असते. वाहनांची गर्दी होऊ नये तसेच इको-फ्रेंडली वाहतुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने कुर्ला स्थानकात ही सेवा सुरू करण्यात आली. या इलेक्ट्रिक बाइकने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आपल्या मोबाइलमध्ये युलू ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. तसेच २५ रुपये अर्धा तास या दराने ही इलेक्ट्रिक बाइक प्रवासासाठी उपलब्ध असणार आहे.