मुंबई - गेल्या अनेक दशकांपासून भारतीयांचा दबदबा असलेल्या युगांडा देशातून आता भारतासाठी थेट विमान सेवा सुरू होणार असून पहिले विमान येत्या ७ ऑक्टोबर रोजी युगांडातील अँटबी येथून मुंबईसाठी उड्डाण करणार आहे.
आजच्या घडीला भारतातून युगांडा येथे जाण्यासाठी दुबई किंवा अन्य मार्गाने जावे लागते. यासाठी किमान १० तासांचा कालावधी लागतो. मात्र, आता थेट विमान सेवा सुरू होणार असल्यामुळे हा विमान प्रवास अवघ्या साडे पाच तासांत होणार आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आली. यावेळी युगांडाच्या भारतातील उच्चायुक्त प्रा. जॉईस काकीफंडा, युगांडाचे मानद कौन्सुल मधुसूदन अगरवाल, युगांडा एअरलाईन्सचे भारतातील मुख्याधिकारी लेनी मालसी यांनी या संदर्भात माहिती दिली.