खंडणी विरोधी पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर येथील बांधकाम व्यावसायिकाला ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गँगस्टर युसूफ सुलेमान कादरी ऊर्फ युसूफ बचकाना याला बेड्या ठोकल्या आहेत. तो हत्येच्या गुन्ह्यात कर्नाटकमधील एका कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. गुन्हे शाखेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांचे घाटकोपर परिसरात कार्यालय आहे. त्यांना १९ मे पासून आंतरराष्ट्रीय व्हाॅट्सॲप क्रमांकावरून ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन येऊ लागले, तसेच फोन करणाऱ्याने कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, छोटा शकील आणि रवी पुजारी यांच्यासाठी काम केल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकाला आणखी घाबरवण्यासाठी त्याने युट्यूबवरील एक व्हिडिओ त्यांना पाठवला होता. त्याने ५० लाख रुपये देण्यास जमत नसतील तर, दोन फ्लॅट देण्याची मागणी या बांधकाम व्यावसायिकाकडे केली.
व्यावसायिकाने नकार देताच, अखेर त्याने घर में छोकरे लोग घुसेंगे और फटाके फोडेंगे तभी तेरेको अच्छा लगेगा, अशी धमकी दिली. पुढे बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार दिली. बांधकाम व्यावसायिकाने धमकीचे फोन उचलणे बंद केल्याने त्यांना मुंबईतील एका लँडलाईन नंबरवरून फोन आला. त्याने युसूफ भाई का फोन क्यु नही उठता असे बोलून पुन्हा या बांधकाम व्यावसायिकाला धमकावले.
याचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपविल्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाला सोबत घेऊन ८ जून रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला. खंडणी विरोधी पथकाने फोन करणाऱ्या व्यक्तीचा माग काढला असता युसूफ बचकाना हा कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथील कारागृहातून आपले अस्तित्व लपवून तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांना आंतरराष्ट्रीय व्हाॅट्सॲप क्रमांकावरून धमकावत असल्याचे उघड झाले. त्यानुसार, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून युसूफ बचकाना याला ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.