लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७६) ऑर्थर रोड कारागृहात गुरुवारी मृत्यू झाला आहे. मनी लाँड्रिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
२०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली लकडावालाला (७६) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हैदराबादचे नबाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथील जमिनीशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्याला अटक केली. वारंवार समन्स बजावूनदेखील हजर न झाल्यामुळे ईडीने अटकेची कारवाई केली.
ऑर्थर रोड कारागृहात असलेल्या लकडवाला हा गेल्या १० वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होता. गुरुवारी सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृह प्रशासनाने जेजे रुग्णालयात नेले. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे.