मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सार्वकालिक उच्चांकावर असून, इंधनदर १५० रुपयांवर जातील की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारवर इंधन दरवाढीविरोधात विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच आता युवासेनेकडून (Yuva Sena) केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदवण्यासाठी सायकल रॅली आंदोलन केले जात आहे.
हेच का अच्छे दिन असा सवाल करत युवासेनेने इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदवला आहे. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या खाईत लोटून अधिक संकटात टाकले आहे. संपूर्ण राज्यांमधील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता याचा तीव्र निषेध म्हणून युवासेना सायकल रॅली आंदोलन करणार आहे.
आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राज्यभर आंदोलन
शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेतर्फे महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातील प्रत्येक शहर आणि तालुक्यामध्ये इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले आहे.
मुंबईत होणार या ठिकाणी आंदोलन
युवासेनेच्या वतीने मुंबईत दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप, मालाड, दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी, वर्सोवा, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, कलिना, कुर्ला, चांदिवली, मुलुंड, भांडूप, घाटकोपर, मानखुर्द, चेंबूर, सायन, माहिम, धारावी, वडाळा, शिवडी, भायखळा, वरळी, मलबारहिल, मुंबादेवी, कुलाबा या ठिकाणी सायकल रॅली आंदोलन केले जाणार आहे.