Join us  

Maharashtra Political Crisis: अंगात त्राण नाही, ताप अन् थकलेले डोळे! आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; शिंदे गटाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 5:20 PM

Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून  राज्यभर दौरे सुरू केले आहेत. मात्र, यातच आदित्य ठाकरे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. या कारणास्तव जळगाव दौराही रद्द करण्यात आला आहे. तत्पूर्वी अंगात त्राण नाही, डोळे थकलेत आणि त्राण नसताना आदित्य ठाकरे यांनी शेकडो शिवसैनिकांसमोर एकनाथ शिंदे गटावर चागंलेच बरसल्याचे सांगितले जात आहे. 

एकीकडे एकनाथ शिंदे गटाला राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नाही. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते एकनाथ शिंदे गटाला खुला पाठिंबा देत असून, पक्ष संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. आणि म्हणूनच आदित्य ठाकरेही पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

शेकडो शिवसैनिकांसमोर शिंदे गटावर सडकून टीका

मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जातेय, कधी माईक खेचला जातोय, कधी हवेत विमान थांबवले जातेय. हे सगळे नाटक सुरु असताना तरुणांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. हे सरकार नक्की कुणाचे आहे? असा प्रश्न तरुणांनी विचारण्याची गरज निर्माण झाले आहे. राज्यात २ लोकांचे जम्बो कॅबिनेट आहे. राज्यात पूर, अतिवृष्टी आहे, महिलांवर अत्याचार होतायेत, पण उत्तर देण्यासाठी सरकार कुठेय? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. अंगात मुरलेला ताप असताना आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केले. आजारापणातही त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरत शिंदे-फडणवीसांवर बोचरे वार केले.

दरम्यान, माझ्या अंगात ताप आहे. सर्दी झालेली आहे. बरे वाटत नाहीये. तुम्हाला त्रास नको म्हणून मी मास्क लावून बोलतोय. सांभाळून घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी संबोधन सुरू करण्यापूर्वीच सांगितले. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिळखिळे केल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आणि हाती शिवबंधन बांधून ठाकरेंना साथ देण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. शेकडो पदाधिकाऱ्यांनी युवासेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाला खुद्द आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी जोरदार भाषण ठोकले. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसशिवसेना