Join us

उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 6:18 AM

युवासेनेने रात्री उशिरा दहापैकी नऊ जागा जिंकल्या.

मुंबई : दोन वर्षांच्या विलंबानंतर पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या युवासेनेने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. युवासेनेने रात्री उशिरा दहापैकी नऊ जागा जिंकून अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकासमंचाच्या पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडाला. 

फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी पार पडली. युवासेनेने राखीव प्रवर्गातील सर्व जागा चार हजारांच्या मताधिक्याने जिंकल्या. तसेच खुल्या प्रवर्गातील तीन उमेदवारांनी पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मिळवून विजय खेचून आणला. अभाविपच्या गोटात दुपारपासूनच शांतता पसरली होती. राज्य सरकारने दोनदा हस्तक्षेप करत ही निवडणूक पुढे ढकलण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. निवडणूक तत्काळ घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार मंगळवारी मतदान पार पडले हाेते.

झोरे, सावंत यांची हॅट्ट्रिक

खुल्या गटातील उमेदवार प्रदीप सावंत यांनी पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची किमया साधली. तर शशिकांत झोरे यांनीही राखीव प्रवर्गातून निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक मारली.

दैनंदिन कामावर परिणाम

फोर्ट परिसरात पोलिस आणि विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने या कॅम्पसमध्ये कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. सबळ कारण नसलेल्या विद्यार्थ्यांना माघारी पाठविले जात होते. 

खुला प्रवर्ग निकाल (मते)प्रदीप सावंत     : १३३८ॲड. अल्पेश भोईर     : ११३७मिलिंद साटम     : १२४६परमात्मा यादव     : १०६४ 

कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्हीचा पहारा 

या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच कडक पोलिस बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या कडक निगराणीखाली मतमोजणी पार पडली. 

मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश असल्याने युवासेना, अभाविप आणि इतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांची गर्दी विद्यापीठ इमारतीबाहेरील पदपथावर जमली होती. 

दुपारी राखीव जागांचे निकाल जाहीर होऊ लागले तसे युवासेनेच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. तर दुसऱ्या बाजूला अभाविपच्या कार्यकर्त्यांची गर्दी कमी होऊ लागली. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठआदित्य ठाकरेभाजपा