Maharashtra Politics: मुंबईतील प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. यानंतर युवासेनेतील एका युवासैनिकाने ट्विट करत सदा सरवणकर यांना उद्देशून भावनिक सवाल केला आहे.
युवासेना कोअर कमिटीचे सदस्य आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे चिरंजीव पवन जाधव यांनी माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना उद्देशून ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या समाधान सरवणकर यांना उद्धेशून या पोस्टमध्ये भावनिक आव्हान करण्यात आले आहे. याला समाधान सरवणकर यांनी उत्तरही दिल्यामुळे हा वाद आणखी वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आईला स्मरुन सांग आदित्यसाहेबांनी काय कमी केलं?
पवन जाधव आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, समा स्वतःच्या मनावर हात ठेवून आणि तुझ्या आईला स्मरुन सांग आदरणीय आदित्यसाहेबांनी तुझ्यासाठी काय कमी केलं की तु त्यांच्या मैत्रीची परतफेड अशी करु शकतोस. तुझी राजकारणातली वाट जरी भरकटली असेल तरी तू एक चांगला मित्र गमावलास हे सत्य लपू शकत नाही..!, असे ट्विट जाधव यांनी केले आहे. या ट्विटला समाधान सरवणकर यांनी उत्तर दिले असून, मी कोणाला उत्तर देत नाही परंतु राजे आपल्याला नक्की देणार राजकारण हे राजकारणाच्या दिशेनी असते. परंतु मित्र जेव्हा हल्ल्याचा आदेश देतो व ज्या वेळी अधिकारी सांगतात तुमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत आमदार याना दादर माहीमच्या कार्यक्रमाचे निरोप न देण्याचे तेव्हा काय वाईट वाटते, असे प्रत्युत्तर समाधान सरवणकर यांनी दिले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. हल्ले करू नका नाहीतर मुंबईत चालणे, बोलणे आणि फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे राणे यांनी म्हटले आहे. तसेच गोळीबार झाला असता तर आवाज तरी आला असता असे म्हणत त्यांनी गोळीबाराचा आरोप फेटाळून लावला आहे.