Shiv Sena Vs Navneet Rana at Matoshree: मुंबईत येऊन मातोश्रीला आव्हान देण्याची हिंमत नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले: वरुण सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 03:26 PM2022-04-23T15:26:47+5:302022-04-23T15:27:46+5:30
Shiv Sena Vs Navneet Rana at Matoshree: मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती जन्मालाच यायची असून, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा नाद करायचा नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे.
मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर (Motoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पोलिसांना आणि सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण न करण्याची घोषणा रवी राणा यांनी केली आहे. यानंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत येऊन मातोश्रीला आव्हान देण्याची हिंमत नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
बिस्लेरीची अर्धी बाटली, बंटी-बबलीची पूर्ण फाटली, अशा घोषणा यावेळेला शिवसैनिकांनी दिल्या. रवी राणा यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर वरुण सरदेसाई यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. पुन्हा अधोरेखित झाले आहे की, महाराष्ट्रात येऊन, मुंबईत येऊन आमच्या मातोश्रीला आव्हान देण्याची हिंमत कुणामध्येही नाही, असे वरुण सरदेसाई यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे आंदोलन मागे घेतल्याबाबत विचारले असता, आता काही कारण तर त्यांना पुढे करावेच लागेल. गेले दोन दिवस घराबाहेर पाऊल टाकायची त्यांची हिंमत झाली नाही. त्यांना पंतप्रधान मोदींचा दौरा हे कारण मिळाले आहे, असा टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला.
पंतप्रधान मोदींचा दौरा व्यवस्थित होईल
नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा व्यवस्थित होईल. यामध्ये काही विषय नाही. पण, मातोश्रीवर येण्याचे आव्हान त्यांनी दिले होते. मात्र, पुन्हा एकदा ते करून दाखवण्याची हिंमत कुणामध्ये नाही, हेच सिद्ध झाले आहे, असे सरदेसाई म्हणाले. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेणे हे नक्कीच शिवसेनेचे यश आहे. मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करतो म्हणत होते. पण, आमचे युवासैनिक जाऊन त्यांच्या अमरावतीच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करून आले. आमच्या शिवसैनिकांनी खारच्या घराबाहेर २४ तास पाहारा दिला. ते एवढे घाबरले की, घराबाहेर पाऊल ठेवले नाही. हीच शिवसेना आणि शिवसैनिकांची ताकद आहे, तीच पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिली आहे. मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती जन्मालाच आलेली नाही, असे सरदेसाई नमूद केले. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा नाद करायचा नाही, असा टोला सरदेसाई यांनी लगावला.
दरम्यान, आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा करत शिवसैनिकांनी आमच्या अमरावतीमधल्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली. आमच्या मुंबईतल्या घराखालीदेखील मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आमच्या घरावर हल्ले झाले. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व शिवसैनिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणा यांनी केली.