वादविवाद, कोर्टकचेरी यामुळे बरेच दिवस लांबलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये अखेर युवासेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपाप्रणित विद्यार्थी संघटना असलेल्याअभाविपचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. सिनेटच्या १० जागांपैकी ७ जागांवर युवासेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर उर्वरित जागांवरही युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक ही युवासेना आणि अभाविपने प्रतिष्ठेची केली होती. तसेच या निवडणुकीवरून दोन्हीकडून न्यायालयीन लढाईही लढली गेली होती. अखेरीस नुकत्याच झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली आणि त्यामध्ये युवासेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली. सिनेटच्या राखीव गटात युवासेनेच्या पाचपैकी पाच उमेदवारांना विजय मिळाला आहे. तर खुल्या गटामध्येही युवासेनेचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
राखीव गटामधून युवासेनेच्या विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल देवरुखकर, धनराज कोचहाडे, शशिकांत झोरे यांचा समावेश आहे. तर खुल्या गटामधून युवासेनेचे प्रदीप सावंत आणि मिलिंद साटम हे विजयी झाले आहेत. याशिवाय खुल्या गटामधून युवासेनेचे इतर तीन उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.