मुंबई: भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यानंतर शिवसैनिक आता आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे. नितेश राणे यांनी मुंबईतील राणीबागेसंबंधी केलेल्या ट्विटनंतर युवासेनेकडून मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे खोटी बातमी पसरवून समाजात तेड निर्माण केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी केली. त्यामुळे त्यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी मलबार हिल युवासेनेचे विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर यांनी केली आहे.
दरम्यान, तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का? अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्वीट करत केली होती.
...मग मी माफी मागण्यास तयार- नितेश राणे
माझ्या ट्वीटबद्दल शिवसेना रोजच आक्रमक होत असते. रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना दुसरं काय काम आहे. यापेक्षा एसटी कामगार, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी आक्रमक झाले असते तर महाराष्ट्राचं भलं झालं असतं, असा टोला यावेळी नितेश राणेेंनी लगावला. मला जी माहिती मिळाली त्यानुसार मी ट्वीट केलं होतं. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आधी त्यांनी हिंदूंची माफी मागावी, मग मी माफी मागण्यास तयार, असं यावेळी त्यांनी सांगितलं.