Aditya Thackeray : "आमची लढाई माणुसकी विरुद्ध खोकासुर," आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 08:37 AM2022-10-15T08:37:58+5:302022-10-15T08:38:49+5:30
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी अर्ज भरला.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके व भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी अर्ज भरले. गेल्या काही दिवसांपासून लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापले होते. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचा राजीनाम्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, शुक्रवारी राजीनामा प्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली.
“राजीनामा न घेण्यासाठी पालिकेवर सरकारचा दाबाव होता. खोके सरकारचे हे घाणेरडे राजकारण आहे. आमची लढाई ही माणुसकी विरुद्ध खोकासुर अशी आहे,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला. “ही जागा पहिले काँग्रेसची होती. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी लटकेंचा विजय झाला होता. त्यांनी कामही चांगलं केलं होतं. आज आमची लढाई लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि लटके परिवारासोबत राहण्यासाठी आहे,” असंही ते म्हणाले.
“लटके ताईंना रोखण्याचे, सतावण्याचे प्रयत्न करण्यात आले. ही कोणत्याही प्रकारची लोकशाही नाही. त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला रोखण्याचे प्रयत्न केले. आमचं सर्वकाही हिसकावून घेतलं. जनतेचं प्रेम आमच्यासोबत आहे आणि तेच आम्हाला विजय मिळवून देतील,” असंही त्यांनी नमूद केलं.
असेआहेराजकीयचित्र
- मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५८ हजार उत्तर भारतीय, ३८ हजार मुस्लीम, ३३ हजार गुजराती, १९ हजार दाक्षिणात्य आणि १४ हजार ख्रिश्चन मतदार आहेत.
- महानगरपालिकेचे ८ प्रभाग आहेत. यातील ५ प्रभागात उद्धव ठाकरे गटाचे असून, दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.
- संभाजी ब्रिगेडने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. तसे पत्र ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी पाठवले.