Join us

'बाबा आजारी होते तेव्हा युवराज पबमध्ये मजा मारत होते'; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 7:36 PM

मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई-

मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी होते आणि आम्ही गद्दारी केली असं वारंवार युवराज बोलत आहेत. त्यावेळी स्वत: युवराज स्वित्झर्लंडमध्ये होते. उद्योगमंत्र्यांची परिषद होती पण पर्यावरण मंत्री स्वत:च तिथं गेले. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी हेच युवराज स्वित्झर्लंडमधील पबमध्ये मजा मारत होते याची सर्व माहिती आज सादर करणार आहे", असा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी यावेळी केला. त्यामुळे आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंबाबत नेमके कोणते पुरावे सादर केले जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

"एक सतत तुणतुण आमच्या कानावर ऐकू येतं ते म्हणजे खोक्यांचं. युवराज नाक्यावरच्या भाषणात सारखं खोके-खोके बोलत असतात. युवराजांचं लहानपणच खोक्यातून गेलं आहे आणि त्यातूनच ते मोठे झाले आहेत. युवराजांना सांगू इच्छितो की ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले त्यावेळी आम्ही ठामपणे बाळासाहेबांसोबत उभे होतो. त्यावेळी युवराजांनी आपल्या वडिलांना विचारायला हवं होतं की तेव्हा आम्हाला किती खोके दिले? राज ठाकरे जेव्हा सोडून गेले तेव्हाही आम्हाला आदेश आले होते की त्यांच्याविरोधात मोर्चा काढा, त्यांना शिव्या द्या मग त्यावेळी आम्हाला किती खोके दिले गेले? माझी पत्नी गरोदर होती आणि माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मला एक फोन आला आणि मला नारायण राणेंविरोधात सभा घेण्यासाठी मला पाठवलं. मी लगेच बॅग भरुन तिथं गेलो. त्यामुळे आमच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे क्षण पक्षासाठी घालवले मग तेव्हा काय आम्हाला खोके दिले होते का? या क्षणांची तुलना कधीच खोक्यांशी होऊ शकत नाही", असा जोरदार हल्लाबोल राहुल शेवाळे यांनी केला. 

...तेव्हा युवराज स्वित्झर्लंडमधील पबमध्ये होते!"ज्यावेळी माझ्या बाबांना कोरोना झाला होता तेव्हा यांनी पक्षात फूट पाडली असं वारंवार युवराज बोलत असतात. मी यावेळी सांगू इच्छितो की ज्यावेळी त्यांचे बाबा ऑपरेशनसाठी रुग्णालयात अॅडमिट होते त्यावेळी युवराज परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेले होते. उद्योग मंत्र्यांना माहित असेल की ती परिषद उद्योग मंत्र्यांची होती तरीही पर्यावरण मंत्री तिथं गेले होते. त्यांच्यासोबत आमच्या खासदारांपैकी एक उच्चशिक्षित महिला खासदार तिथं गेल्या होत्या. आता आमच्यापैकी त्याच एकट्या उच्चशिक्षीत आहेत असं त्यांना वाटतं. त्या महिला खासदाराला आमंत्रणही नसताना तिथं नेलं गेलं. ज्यावेळी उद्धव ठाकरे रुग्णालयात होते त्यावेळी हेच लोक स्वित्झर्लंड आणि लंडनमधील पबमध्ये मजा मारत होते याची संपूर्ण माहिती लोकांसमोर सादर करायची आहे", असं राहुल शेवाळी म्हणाले. 

टॅग्स :राहुल शेवाळेआदित्य ठाकरे