मुंबई : ज्येष्ठ सिने अभिनेत्री झीनत अमान यांनी विनयभंगाचा आरोप केलेल्या मोहम्मद सर्फराज एहसान उर्फ अमर खन्ना (३८) याला जुहू पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. अमर खन्नाने शिवीगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे झीनत अमान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.जमिनीच्या प्रकरणावरून झीनत आणि खन्नामध्ये वाद सुरु होते. याबाबत अमर खन्ना सतत मेसेज करून त्रास देत असे. शिवाय, फोन करून शिवीगाळ करत असे. २५ जानेवारीला रात्री पाऊणे तिनच्या सुमारास खन्ना याने यांच्या घराजवळ गोंधळ घातला. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच २७ जानेवारी रोजी देखील त्याने पुन्हा झीनत यांच्या घराजवळ येऊन झीनत यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.तसेच त्यांच्या मुलाला देखील खोट्या प्रकरणात गुंतविण्याची धमकी दिल्याची तक्रार अमान जुहू पोलीस ठाण्यात जाऊन केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी खन्नाविरोधात विनयभंग आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करत गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.
झीनत अमान विनयभंगप्रकणी अमर खन्नाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 4:54 AM