लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस (आयपीएफ) हा आजार झालेल्या रुग्णाला वाचविण्याकरिता त्याच्यावर योग्य वेळी फुप्फुसाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. या आजारामुळे प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांचे सोमवारी निधन झाले.
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील श्वसनविकार या विभागातील डॉक्टर अवधेश बन्सल यांनी सांगितले की, आयपीएफपायी रुग्णाचा होणारा मृत्यू हा औषधे व ऑक्सिजनचा पुरवठ्यामुळे सात ते आठ वर्षे लांबविता येऊ शकतो. पण, या रुग्णाला वाचविण्यासाठी फुप्फुसाचे प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय आहे. त्या आजारामुळे रुग्णाची स्थिती नेमकी कशी बनली आहे, याचा अभ्यास करून डॉक्टर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतात. भारतामध्ये आयपीएफ जडल्यापासून रुग्ण पुढील १० ते १२ वर्षे जगतो, असे आढळून आले आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीतील रोगप्रतिकारक शक्तीचे प्रमाण कमी-जास्त असते. सुमारे ५० टक्के रुग्णांमध्ये हा आजार कशामुळे होतो, हे कळत नाही. त्यामुळेच त्याला इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस, असे नाव देण्यात आले आल्याचे डॉक्टर अवधेश बन्सल यांनी सांगितले.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे, असे आहे
आयपीएफचे स्वरूप आयपीएफमध्ये फुप्फुसातील पेशींची जागा फायब्रोटिक पेशी घेतात. त्यामुळे फुप्फुसातून रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन जाण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. फुफ्फुसातील फायब्रोसिसचे अनेक प्रकार आहेत. त्यातील आयपीएफ हा अनेक रुग्णांमध्ये आढळून येतो. वयाच्या ५० व्या वर्षी हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता असते, असे डॉक्टर अवधेश बन्सल यांनी सांगितले.
आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. विविध क्षेत्रांतील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन ही दु:खद घटना आहे. त्यांनी आपली अलौकिक बुद्धिमत्ता, कला यांच्या साहाय्याने सीमांची बंधने पार करून भारतीय संगीताला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रात कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. झाकीर हुसेन हे कला आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी सर्वांच्या कायम स्मरणात राहातील. - डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे. त्यांनी जगाला तबल्याचे वेड लावले. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
झाकीरभाईंसोबत माझे संबंध ४५ वर्षांपेक्षाही जुने होते. पं. शिवकुमार शर्मा, मी आणि झाकीरभाई, अशा आम्ही तिघांनी एकत्र खूप प्रवास केला आहे. या व्यक्तिमत्त्वाचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. कोणीही भेटले तरी त्याच्याशी खेळकर वृत्तीने वागायचे. - पं. सतीश व्यास
ऑफस्टेज केमिस्ट्री असलेली केमिस्ट्री स्टेजवरही दिसते, पण आम्हाला त्यावेळी समजत नसायचे. आज मात्र त्या गोष्टीचे महत्त्व समजते. तरुण पिढीला स्टेजवर कसे आणायचे यासाठी ते कायम प्रयत्न करायचे. वेस्टर्न म्युझिकशीही त्यांचे नाते होते. - पं. राकेश चौरसिया
उस्ताद झाकीर हुसेन यांना मी प्रेमाने झाकीरभाई म्हणायचो. असा कलाकार झाला नाही आणि होणारही नाही. प्रत्येक देशातील मोठमोठ्या ब्रॅण्ड्सचे तसेच चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, इंग्लंड, आदी देशांतील कलाकारांचे झाकीरभाई हिरो होते. - अनुप जलोटा