मुंबई - राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि मुस्लीम यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेतून हिंदू मुस्लीम यांच्यातील दरी वाढवून वाद उभा करण्याचा डाव असल्याचा आरोपही काही नेत्यांकडून होत आहे. नुकतेच रमजान ईददिवशी देशातील हिंदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्य आणि सामाजिक सलोखा दिसून आला. तर, उस्ताद झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल फोटोने पुन्हा एकदा राम-रहीम ऐक्याचं ज्वलंत उदाहरणच देशाला दाखवून दिलंय. पंडित शिवकुमार शर्मा यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईतील पाली हिल स्थित निवासस्थानी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. त्यानंतर, 11 मे रोजी त्यांच्यावर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शर्मा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यातील एक म्हणजे जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन. इतर कलाकार आणि मित्रांपेक्षा झाकीर हुसैन यांच्या फोटोने नेटीझन्सचे लक्ष वेधले.
पंडित शर्मा आणि झाकीर हुसैन यांची गेल्या 55 वर्षांपासूनची अखंडीत प्रेमाची मैत्री होती. झाकीर हुसैन 16 वर्षांते होते, तेव्हा मुंबईतील दादर परिसरातील शिव मंदिर हॉलमध्ये दोघांनी एकत्र कार्यक्रम केला होता. तेव्हापासून आपल्या कारकिर्दीत या दोन्ही दिग्गज कलाकारांनी बहुतांशवेळा एकत्र कार्यक्रम केले आहेत.