मुंबई : परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामिक धर्मोपदेशक झकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द केल्याने त्याने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. धर्मामुळे आपल्याला लक्ष्य करण्यात येत आहे, असा दावा त्याने केला आहे.झकीर नाईक दहशतवादी संघटनांना निधी पुरवत असल्याचा संशय राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) व सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) असल्याने त्यांनी त्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. तपासयंत्रणांनी वारंवार समन्स बजावूनही नाईक चौकशीसाठी हजर न राहिल्याने परराष्ट्र मंत्रालयाने त्याचा पासपोर्ट रद्द केला. या निर्णयाला नाईकने उच्च न्यायालयात आव्हान दिले.मी कधीच कोणालाही कोणत्याही धर्माविरुद्ध भडकवले नाही व कोणतेही बेकायदा कृत्य केले नाहीे, असे नाईकने याचिकेत म्हटले आहे.मी मुस्लीम असल्याने तपासयंत्रणा माझ्यावर खोटे गुन्हे नोंदवून मला लक्ष्य करीत आहेत, असा दावा नाईक याने याचिकेत केला आहे. काही महिन्यांपूर्वी झकीर नाईक देश सोडून फरार झाला. झकीर नाईकवर चिथावणीखोर भाषण करून समाजात द्वेष पसरविण्याचा, दहशतवादी संघटनांना निधी पुरविण्याचा आणि मनी लाँड्रिंगअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.तपासयंत्रणेकडे माझ्याविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे नाहीत, असा दावा झकीर नाईकने केला आहे. फरार झाल्यानंतर त्याने मलेशियात आश्रय घेतला आहे.
पासपोर्ट रद्द करण्याविरुद्ध झकीर नाईकची उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:31 AM