मुंबई : देशातून फरार झालेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष आणि इस्लामिक धर्मोपदेशक झकीर नाईक याला ३१ जुलैपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश विशेष पीएमएलए न्यायालयाने सोमवारी दिला. दिलेल्या मुदतीत तो न्यायालयात हजर राहिला नाही, तर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा इशाराही न्यायालयाने यावेळी दिला.झकीर नाईकचे वास्तव्य मलेशियात असावे, असा तपासयंत्रणेला संशय आहे. अनेकवेळा समन्स बजावूनही नाईक चौकशीसाठी हजर राहिला नसल्याने, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करावे, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी होती. दोन समाजांमध्ये अशांतता निर्माण करणे, बेकायदेशीर कृत्य करणे, असे गुन्हे नाईकवर नोंदविले आहेत. त्याशिवाय ढाकामध्ये जुलै, २०१६ मध्ये एका बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणात त्याचा हात असल्याचा संसय तपासयंत्रणेला आहे.बेकरीवर हल्ला केलेल्या दोघांनी आपण झकीर नाईकच्या भाषणाने प्रभावित होऊन हा हल्ला केल्याचे तपासयंत्रणेला सांगितले आहे.काही दिवसांपूर्वीच मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी नाईकचा ताबा भारताला देण्यास नकार दिला. २०१५मध्ये आॅस्ट्रेलियाने सिरुल अझहर उमर याच ताबा मलेशियाला देण्यास नकार दिला होता. त्याच कारणांच्या आधारे आम्हीही नाईकचा ताबा भारताला देण्यास नकार देऊ शकतो, असे मोहम्मद यांनी म्हटले. भारतामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही, असे नाईक याचे म्हणणे असल्याचेही मोहम्मद यांनी सांगितले.
झकीर नाईक हाजीर हो; ३१ जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:15 AM