झवेरी पूनावाला यांची ४१ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:34 AM2023-05-09T05:34:47+5:302023-05-09T05:36:35+5:30
परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत (फेमा) ही कारवाई केली आहे.
मुंबई : परदेशी पैसे पाठविण्याच्या योजनेचा (लिबरलाईज रेमिटन्स स्कीम) गैरफायदा घेत मर्यादेपेक्षा जास्त पैसे परदेशात पाठविल्याचा ठपका ठेवत ईडीने प्रसिद्ध उद्योगपती झवेरी पूनावाला यांची मुंबईच्या वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील तीन मालमत्तांची जप्ती सोमवारी केली. या मालमत्ताची किंमत ४१ कोटी ६४ लाख रुपये इतकी आहे. परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत (फेमा) ही कारवाई केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २०११ ते २०१२ या कालावधीमध्ये पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे परदेशात पाठवले. यातील काही रकमा परदेशात पाठविताना त्यांची चुकीची माहिती दिल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. हे पैसे कुटुंबाच्या देखभालीसाठी पाठविण्यात आल्याचा पूनावाला यांचा दावा होता. मात्र, त्यांच्या कुटुंबाचा कोणताही सदस्य परदेशात राहात नाही किंवा अनिवासी भारतीय नाही, असा दावा ईडीने केला आहे.
पूनावाला यांनी संबंधित पैसे ब्रिटनमध्ये पाठवले आणि तेथील स्टॉलेल्स लि. या कंपनीत ते गुंतविल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तसेच या पैशांतून त्यांनी ब्रिटनमध्ये चार मालमत्तांचीदेखील खरेदी केली आहे.
याखेरीज, परदेशी कंपनीत त्यांनी गुंतवणूक केल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात ती कंपनी पूनावाला यांच्याच मालकीची असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
तसेच, परदेशात केलेल्या या व्यवहारांची कोणतीही माहिती पूनावाला यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला दिली नसल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात पनामा पेपर्सच्या माध्यमातून परदेशात गुंतवणूक केलेल्या काही भारतीयांची नावे उजेडात आली होती. त्यात पूनावाला यांचेही नाव होते.