मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी अमर खन्ना नावाच्या व्यक्तीविरोधात विनयभंग व धमकावल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. खन्ना याच्या धमकीला कंटाळून तक्रार देत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केल्याचे समजते. या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही माहिती देण्यास नकार दिला.
दरम्यान, 38 वर्षीय आरोपी अमर खन्ना एकेकाळी फिल्ममेकर होता, असे म्हटले जात आहे. तसंच काहींच्या मते, तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात सक्रीय आहे. ''27 जानेवारीला अमर खन्नानं बिल्डिंगखाली येऊन धमकावलं. तसंच सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालत त्यांनाही मारहाणही केली'', असा आरोप झीनत अमान यांनी केला आहे.
तसंच गेल्या काही दिवसांपासून खन्ना व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत असल्याचा आरोप झीनत अमान यांनी केला आहे.पोलिसांनी अमर खन्नाविरोधात 354 (ड) (पाठलाग करणं), 509 आयटी अॅक्ट (महिलेला धमकी देणं) तसंच इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अमर खन्ना सध्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.