Join us

माहीममध्ये शून्य बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:16 AM

मुंबई : धारावी आणि दादरपाठोपाठ आता माहीम भागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. सोमवारी दादर, धारावीमध्ये १३ रुग्णांची ...

मुंबई : धारावी आणि दादरपाठोपाठ आता माहीम भागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. सोमवारी दादर, धारावीमध्ये १३ रुग्णांची नोंद झाली, तर माहीमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर जी उत्तर विभाग हॉटस्पॉट बनला होता. मात्र, फिव्हर क्लिनिक, चेस द व्हायरस, जास्तीतजास्त लोकांची चाचणी, तत्काळ निदान, योग्य उपचार, यामुळे धारावी, दादर आणि माहीम या भागात कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला आहे. धारावी पॅटर्नचे कौतुक तर जागतिक स्तरावर करण्यात आले. सोमवारी धारावीत पाच तर दादरमध्ये आठ रुग्णांची नोंद झाली.

धारावी भागात सध्या २४ सक्रिय रुग्ण आहेत, तर दादर परिसरात ९१ रुग्ण उपचार घेत आहेत. माहीम परिसरात २११ रुग्ण सक्रिय आहेत. धारावी, दादरमध्ये गेल्या महिन्यापासून एक अंकी रुग्णसंख्या आढळून येत आहे, तर माहीममध्ये सोमवारी शून्य इतकी रुग्णसंख्या होती. या तिन्ही विभागांमध्ये आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३ हजार २४३ एवढी झाली आहे.

विभाग...एकूण ....सक्रिय....डिस्चार्ज

दादर....४,८०२..९१...४,५३८

धारावी...३,८२६...२४...३,४९०

माहीम...४,६१५...२११...४,२६०