झीरो युरो नोटांमधून महात्मा गांधीजींच्या स्मृतींना देणार उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:47 AM2019-03-04T05:47:53+5:302019-03-04T05:48:03+5:30
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत.
मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत. गांधीजींच्या जीवनातील १२ लोकप्रिय घटना या झीरो युरो नोटांच्या मालिकांतून दिसणार आहे. विशेष म्हणजे जगभरात प्रत्येक नोटेच्या केवळ ५ हजार मर्यादित आवृत्त्याच छापल्या जाणार असल्याचे इंटरनॅशनल बँक नोट सोसायटीच्या दुबई शाखेचे अध्यक्ष राजकुमार यांनी स्पष्ट केले. या बाराही नोटांचे अनावरण यूएईत होणार आहे. त्यातील पहिल्या दोन नोटांचे पहिल्या टप्प्यात अनावरण होणार असून उरलेल्या नोटांचे अनावरण २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने केले जाईल.
या नोटा गांधीजींच्या वैयक्तिक व राजकीय जीवनातील रंजक व लोकप्रिय घटनांवर आधारित आहेत. गांधीजींच्या जीवनातील प्रसंग केवळ इतिहासातील धडे म्हणून मर्यादित न राहता, या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवत
असल्याचे राजकुमार यांनी सांगितले. या विशेष नोटा दीर्घकाळ जतन करता येतील. यापूर्वी गांधीजींच्या १००व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने गांधीजींची प्रतिमा असणाऱ्या विशेष नोटा १९६९मध्ये जारी केल्या होत्या. या नोटा लोकांच्या वापरासाठीही होत्या. त्यातील ४५ विशेष नोटांचा संग्रह राजकुमार यांनी केल्याने त्यांचे नाव लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांच्याकडे सर्व क्रमांकाच्या नोटा असून त्यात एक रुपयाच्या १८, दोन रुपयांच्या पाच, १० रुपयांच्या १३ तर १०० रुपयांच्या दोन नोटांचा समावेश आहे.
>१२ नोटांची मालिका
सुरुवातीला केवळ एकच विशेष नोट तयार करणार होतो. पण महात्मा गांधींजींचे आयुष्य इतके प्रेरणादायी आहे की ते एका नोटेमध्ये साकारणे शक्य नाही व त्यामुळे त्याला पूर्ण न्याय देता येणार नाही. त्यामुळे १२ नोटांची मालिका करायचे ठरवले. त्याची सुरुवात प्रथम दोन नोटांचे अनावरण करून करणार आहे. या दोन्ही नोटा गांधीजींच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या घटनांवर आधारित आहेत.
- राजकुमार, अध्यक्ष - दुबई शाखा, इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी
>नोटेवर काय दिसणार?
कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला जाण्यापूर्वी मोहनदास गांधी (महात्मा गांधी) यांनी आई पुतळीबाई यांना दिलेल्या तीन वचनांचे चित्रण पहिल्या नोटेत आहे. त्यात ते कधीही मद्यप्राशन करणार नाहीत; मांसाहार करणार नाहीत आणि अन्य स्त्रियांकडे माता किंवा भगिनी म्हणून पाहतील, याची झलक दिसते. तर दुसऱ्या नोटेमध्ये ‘केवळ श्वेतवर्णीय’ व्यक्तींच्या विभागातून बाहेर जाण्यास नकार दिल्याने गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग या स्थानकावर रेल्वेतून बाहेर ढकलण्यात आल्याचा १८९३ मधील प्रसंग रेखाटण्यात आला आहे.
>झीरो युरो नोट म्हणजे काय?
झीरो युरो नोट ही सुव्हिनिअर नोट असून तिला युरोपीयन सेंट्रल बँकेने मान्यता दिली आहे. युरो बँक नोटा छापल्या जातात त्याच सिक्युरिटी प्रिंटरकडे त्या छापण्यात आल्या आहेत. नोटेवर अंक स्वरूपात असलेली ‘शून्य’ ही खूण वगळता युरो नोटांवर असणारी सुरक्षेची सर्व वैशिष्ट्ये या नोटांवरही आहेत. तसेच कायदेशीर वित्तीय चलन म्हणून त्या वापरल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतल्याचे इंटरनॅशनल बँक नोट सोसायटीच्या दुबई शाखेचे सचिव स्टीव्ह यांनी सांगितले.