‘झीरो मिशन’द्वारे एड्सचे प्रमाण शून्यावर आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:01 AM2018-12-02T06:01:35+5:302018-12-02T06:01:46+5:30
राज्यातील एड्स रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ०.७ टक्क्यापर्यंत कमी झाले. पुढील काळात ‘झीरो मिशन’च्या माध्यमातून हे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई : राज्यातील एड्स रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ०.७ टक्क्यापर्यंत कमी झाले. पुढील काळात ‘झीरो मिशन’च्या माध्यमातून हे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकरिता राज्यातील प्रत्येक एड्स रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सभागृह, पार्सल बिल्डिंग येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य विभाग व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एचआयव्ही एड्सविषयी माहिती देणाऱ्या ‘समाधान’अॅपचे अनावरण करण्यात आले. अॅप व माहिती प्रदर्शनाचे अनावरण आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर, एड्स तपासणी व रक्तदान शिबिरालाही डॉ. सावंत यांनी भेट दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्यसेवा संचालक डॉ. संजीव कांबळे, मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. श्यामसुंदर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक विशाल अग्रवाल, तसेच एड्स नियंत्रण समितीचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, एड्सग्रस्त रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे. या रुग्णांकरिता राज्यात उपचार पद्धती सुरू झाल्या असून, यासाठी लागणारा औषधपुरवठा उपलब्ध झाला आहे. यामुळे एड्स रुग्णांच्या मनातील अपराधाची भावना कमी झाली आहे. वर्ल्ड एड्स संस्थेने यंदा एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ङल्लङ्म६ ङ्म४१ र३ं३४२’ हे ब्रीदवाक्य असून, एड्सबाबत आपले स्टेटस काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. याबाबतची माहिती गोपनीय राहील, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
एड्स रोगाचे आईपासून मुलाला होणारे संक्रमण याकरिता कंट्रोल एक्झिबिशनमध्ये, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला बक्षीस मिळाल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अशासकीय संस्था व अधिकारी वर्गाचे चांगले काम केल्याबदल अभिनंदन केले. डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील प्रत्येक रुग्णाला नॅक टेस्ट असलेले रक्त मिळाले पाहिजे. यावर काही मर्यादा आहेत. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. नॅक टेस्ट असलेले रक्त राज्याच्या सर्व रक्तपेढ्यांत पोहोचले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जायचे आहे. या दिनानिमित्त नव्या उमेदीने एड्सचा मुकाबला करायचा असून, राज्याला एड्समुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
>एड्स रुग्णांच्या संख्येत ५० टक्के घट
एड्स नियंत्रण संस्थांतर्फे एड्सच्या उपचाराकरिता जवळपास चार हजार उपचार केंद्रे राज्यात उपलब्ध आहेत. मोबाइलवरील स्टेटस पाहण्यापेक्षा एड्सबाबतचे आपले स्टेटस जाणून घेण्याची वेळ आली आहे. राज्यात ३ हजार ९५७ केंद्र आहेत. आईपासून मुलाला होणारे एड्सचे संक्रमण कमीतकमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. २०११च्या तुलनेत राज्यातील एड्सच्या रुग्णांच्या संख्येत २०१७ मध्ये ५० टक्के घट झाली आहे, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉक्टर अनुप कुमार यांनी सांगितले.