काेराेनाचे केवळ १२ सक्रिय रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जागतिक रोल मॉडेल ठरलेल्या धारावीने आणखी एक पराक्रम करून दाखविला आहे. आशिया खंडातील ही सर्वांत मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात येथे पहिला बाधित रुग्ण आढळला होता. तब्बल नऊ महिन्यांनंतर शुक्रवारी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. सध्या केवळ १२ सक्रिय रुग्ण आहेत.
अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. त्याुळेच काेराेना संसर्ग राेखणाऱ्या ‘धारावी पॅटर्न’चे जगात कौतुक केले जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय, सर्व खबरदारीसाेबतच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. धारावीत यशस्वी ठरलेली ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे.
* असा आहे ‘धारावी पॅटर्न’
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. मात्र दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग रोखणे आव्हानात्मक ठरत होते. परंतु, संस्थात्मक विलगीकरण, जास्तीतजास्त रुग्णांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात धारावीला यश आले. चेस दि व्हायरस, फिव्हर क्लिनिक अशा विविध मोहिमा कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात महत्त्वाच्या ठरल्या.
धारावीमध्ये एकही बाधित रुग्ण न सापडणे हे पालिकेच्या टीम वर्कमुळे शक्य झाले आहे. त्वरित तपासणी, तत्काळ निदान, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचणे आणि चांगले उपचार हेच धारावीच्या यशाचे गमक आहे. आजच्या घडीला धारावीत १२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी आठ होम क्वारंटाईन आणि चार रुग्ण कोरोना काळजी केंद्रात उपचार घेत आहेत.
- किरण दिघावकर (सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग)
* २५ डिसेंबरपर्यंत जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या
परिसर..... एकूण रुग्ण.. सक्रिय.... डिस्चार्ज
दादर.... ४,७५०... १०६..... ४,४७१
माहिम.... ४,५६१.. २१२.... ४,२०५
धारावी.... ३,७८८... १२.... ३,४६४
---------------------