कोरोना चारीमुंड्या चित! धारावीत नऊ महिन्यांत पहिल्यांदाच नवी रुग्णसंख्या शुन्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 07:57 PM2020-12-25T19:57:51+5:302020-12-25T19:58:30+5:30
CoronaVirus Dharavi News: अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी लोकसंख्या येथे आहे. अशा धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र आज याच धारावी पॅटर्नचे जगात कौतुक केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यात जागतिक रोल मॉडेल ठरलेल्या धारावीने आणखी एक पराक्रम करून दाखविला आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी झोपडपट्टी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात येथे पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता. तर तब्बल नऊ महिन्यानंतर शुक्रवारी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. सध्या या ठिकाणी केवळ १२ सक्रिय रुग्ण आहेत.
अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी लोकसंख्या येथे आहे. अशा धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र आज याच धारावी पॅटर्नचे जगात कौतुक केले जात आहे. प्रतिबंधक उपाय, सर्व खबरदारीबरोबरच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. तर धारावीत यशस्वी ठरलेली 'चेस द व्हायरस' ही मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे.
असा आहे धारावी पॅटर्न....
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्त्वाचे आहे. मात्र दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रसार रोखणे आव्हानात्मक ठरत होते. परंतु, संस्थात्मक विलगीकरण, जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, तात्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात धारावीला यश आले. चेस दि व्हायरस, फिव्हर क्लीनिक अशा मोहीम कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात महत्त्वाच्या ठरल्या.
धारावीमध्ये एकही बाधित रुग्ण न सापडणे हे पालिकेच्या टीम वर्कमुळे शक्य झाले आहे. त्वरित तपासणी, तात्काळ निदान, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचणे आणि चांगले उपचार हेच धारावीच्या यशाचे गमक आहे. आजच्या घडीला धारावीत १२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी आठ होम क्वारंटाइन आणि चार रुग्ण कोरोना काळजी केंद्रात उपचार घेत आहेत.
- किरण दिघावकर (सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग)
२५ डिसेंबरपर्यंत जी उत्तर विभागातील रुग्ण संख्या...
परिसर.....एकूण रुग्ण..सक्रिय....डिस्चार्ज
दादर....४७५०...१०६.....४४७१
माहीम....४५६१..२१२....४२०५
धारावी....३७८८...१२....३४६४