शून्य सावली दिवस : मुंबईकरांची सावली झाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:48 PM2020-05-15T17:48:45+5:302020-05-15T17:49:31+5:30
शुक्रवारी ठिक दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईकरांची सावली गायब झाली; थोडक्यात मुंबईकरांची सावली स्वत:च्याच पायाखाली आली.
मुंबई : शुक्रवारी ठिक दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईकरांची सावली गायब झाली; थोडक्यात मुंबईकरांची सावली स्वत:च्याच पायाखाली आली. त्यास वैज्ञानिक निमित्त होते ते शून्य सावली दिवसाचे. आता शून्य सावलीचे दिवस सुरु झाले असून, नागरिकांची सावली गायब म्हणजे पायाखाली येत आहे. त्यामुळे ती त्यालादेखील दिसेनाशी होत आहे. खगोलशास्त्रीय भाषेत यास झिरो शॅडो असे संबोधले जात असून, ३ मे पासून सुरु झालेला हा सावल्यांचा खेळ ३१ मे पर्यंत चालणार आहे.
सुर्य डोक्यावरुन असतो; तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तुची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र ज्यावेळी काही क्षण ही सावली गायब होते, या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत झीरो शॅडो किंवा शुन्य सावली असे म्हणतात. सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहर व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे. महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत.
भारतात शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशावरून कर्कवृत जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली ही घटना घडत नाही कारण डोक्यावर लंबरूप सुर्य किरणे येथे पडू शकत नाही. महाराष्ट्रात मे ते जुलै अशा दोन्ही महिन्यात असा अनुभव पाहायला मिळतो. मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे हा अनुभव घेता येतो, मात्र, जुलै महिन्यात ढगाळ वातावरणामुळे हा अनुभवता क्वचितच येतो. दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीत ही शुन्य सावली वैज्ञानिक घटना अनुभवता येते.
-----------------------------
शुन्य सावली दिवस आणि ठिकाणे
१६ मे - बोरीवली, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी
१७ मे - नाला सोपारा, विरार, आसनगाव, बसमत
१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड, हिंगोली
१९ मे - डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद
२० मे - तलासरी, मेहेकर, वाशीम, वणी, चंद्रपूर, मूळ
२१ मे - मनमाड, कन्नड,चिखली
२२ मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी
२३ मे - खामगाव, अकोला, वर्धा
२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, निम्बोरा, उमरेड
२५ मे - साक्री, अमळनेर, जळगाव, भूसावळ, अमरावती
२६ मे - चोपडा, परतवाडा, नागपूर
२७ मे - नंदुरबार, शिरपूर, गोंदिया
२८ मे - शहादा, पांढुरणा