Join us

पुण्यात सापडला झिकाचा रुग्ण; राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 5:35 PM

झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात.

मुंबई : नुकताच पुण्यात झिकाचा रुग्ण सापडला. आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. उपचाराअंती हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने आरोग्य विभागाने दिलासा व्यक्त केला आहे. कोरोनासह अन्य विषाणूंना रोखण्यासाठी आरोग्य विभाग खबरदारी घेत आहे. सर्वसामान्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही, तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.

राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली, तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. याकरिता डेंग्यू आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे रक्त/रक्तद्रव दोन ते आठ तापमानात शीतलता ठेऊन तपासणीसाठी पाठवावे. प्रयोगशाळा नमुन्यासोबत रुग्णाची संक्षिप्त माहिती देणारा फॉर्म भरून पाठवावा. हा फॉर्म राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

टॅग्स :पुणेमहाराष्ट्र सरकार