मुंबई : दहिसर पश्चिमेकडील झेन उद्यानात पर्यटकांसाठी आकर्षक पाषाण चित्रे रेखाटण्यात आली आहेत. याठिकाणी लहान मुलांसाठी पार्क, योगा सेंटर व ओपन जिम आदी सुविधा उपलब्ध आहेत. आता येथे रेखाटण्यात आलेल्या प्राण्यांच्या आकर्षक पाषाणचित्रांमुळे याठिकाणी येणाऱ्या स्थानिक नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चित्रे आता सेल्फी पॉईंट बनली आहेत.
विशेष म्हणजे येथील पाषाण 6 हजार वर्षापूर्वीची असून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या आकर्षक उद्यानाचे उदघाटन 2009 साली करण्यात आले होते. पालिकेचा एकही रुपयांचा निधी न वापरता शिवसेना उपनेते,म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली.
या झेन उद्यानात असलेल्या पाषाणाचे संवर्धन करण्यासाठी सुरुवातीला एका पाषाणावर आफ्रिकन हत्तीचे चित्र रेखाटण्यात आले होते. त्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आता तेथील इतर पाषाणावर वाघ, मगर, मोर, खवले मांजर व जलपरीचे आकर्षक 3 डी चित्र रेखाटण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. त्यांच्या संकल्पनेतून ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
येथे काढण्यात आलेल्या प्राण्यांच्या आकर्षक चित्रांमुळे याठिकाणी भेट देणाऱ्या स्थानिक नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या आकर्षक प्रकाशात ही चित्रे जिवंत वाटतात. या थ्रीडी चित्रांमुळे खरोखरच तेथे प्राणी उभा असल्याचा भास पर्यटकांना होतो. दरम्यान या प्राणी चित्रांच्या नजीक माहिती फलक लावण्यात येणार आहे. जेणेकरून पर्यटकांना प्राण्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकेल असे माजी नगरसेवक मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. तसेच सध्या अनेक लहान मुले राणीची बाग अथवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे न जाता मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसून येते. यामुळे या उपक्रमाद्वारे प्राणिमात्रांबद्दल बालगोपाळाना माहिती मिळून पर्यावरणासंदर्भात एकप्रकारे जनजागृती होणार असल्याचे घोसाळकर यांनी शेवटी सांगितले.