दुर्मिळ पशू-पक्ष्यांसाठी आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय; पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:16 AM2019-06-06T02:16:11+5:302019-06-06T06:26:26+5:30
सामंजस्य करारावर स्वाक्षरी: जागतिक दर्जाचे झू साकारणार, सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार
मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे आरेमधील हरित पट्टयावर जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालय बनविण्यात येणार आहे. दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजननासाठी हे प्राणिसंग्रहालय महत्वपूर्ण भूमिका बजावेल. दुर्मिळ पशु-पक्षी, प्राणी नष्ट होऊ नयेत म्हणून नैसर्गिक वातावरणात त्यांच्या प्रजननासाठी या प्राणिसंग्रहालयाचा उपयोग होणार असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी शास्त्रातील तज्ज्ञ यांच्या सहकार्याने महापालिका ‘स्वतंत्र झु फाऊंडेशन’ कार्यान्वित करणार आहे. मात्र येथील प्राणीसंग्रहालयास पर्यावरणवाद्यांनी मात्र विरोध दर्शविला असून, बुधवारी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर प्राणीसंग्रहालयास विरोध करणारे संदेश दर्शविले.
महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिका यांच्यात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गोरेगावातील आरेमधील ‘जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालय’ साठी जागा हस्तांतरण सामंजस्य करार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील सभागृहात ५ जून रोजी पार पडला. शासनाच्या वतीने प्रमुख वन संरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अन्वर अहमद व पालिकेच्या वतीने उप आयुक्त सुनील धामणे यांनी जमीन हस्तांतरण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उद्धव ठाकरे व सुधीर मुनगंटीवार यांनी सामंजस्य कराराच्या प्रतींचे अदान-प्रदान केले.
दुसरीकडे येथील प्राणीसंग्रहालयास पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविला आहे.
आरेच्या जंगलाला मोकळा श्वास द्या, बंदिस्त प्राणीसंग्रहालय नको, सेव्ह आरे. जंगलाचाही विस्तार झाला, माझ्या घराभोवती पिंजरा आला. आरेचा शेवट पद्धतशीर मार्गाने केला जाईल. मेट्रो कारशेड आता प्राणिसंग्रहालय नंतर आरटीओचे आॅफीस येईल. अतिशय संपन्न अशी वृक्ष संपदा आणि जैव वैविध्य असलेल्या या जंगलात माणसांचे लोंढे आणले जातील. उरलेली जमीन बिल्डरांच्या घशात घातली जाईल. आणि आपण मुंबईकर विकेंडला पिंजºयातले प्राणी बघताना एक गोष्ट साफ विसरून जाऊ की कोणे एके काळी आरे जगातले सर्वात जास्त बिबटे असलेले शहरातले एकमेव जंगल होते, अशा आशायाचे संदेश पर्यावरणवादी व पर्यावरण कार्यकर्ते सुशांत बाली यांनी दिले. दरम्यान, येथील जंगल नष्ट करणारी कोणतीच गोष्ट नको, असे आरे कर्न्झव्हेशन ग्रुपच्या अमृता भट्टाचार्य यांनी सांगितले.
सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयात ‘नाईट सफारी’ साठी पर्यटकांच्या जशा रांगा लागतात, तशा रांगा मुंबईतही नवीन होणाºया प्राणिसंग्रहालयात लागल्या पाहिजेत, यासाठी आपण शासनाच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालय विकसित करत आहोत. महालक्ष्मी रेसकोर्स जागेवर आंतरराष्ट्रीय खुले मैदान विकसित केले पाहिजे. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
प्राणिसंग्रहालय प्राण्यांच्या प्रजातीचे प्रजनन, प्राण्यांची इंतभूत माहिती, पर्यटकांचे मनोरंजन, दुर्मिळ पशु-पक्ष्यांचे अवलोकन असणारे विद्यापीठ ठरेल. शासनाने आरेतील १२० एकर जागा हस्तांतरीत केली असून महापालिकेस ज्या समस्या भेडसावतील त्यांचे शासन निराकरण विशेष बाब म्हणून पूर्ण करेल. - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
शासन व महानगरपालिका यांच्यात १२० एकर जागेचा हस्तांतरण सामंजस्य करार झाला आहे. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस असून मुंबईकरांना व पर्यटकांना सदर प्राणिसंग्रहालय हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरेल. - विश्वनाथ महाडेश्वर, महापौर