नागपूर/मुंबई - विदर्भातील 5 जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकींच्या निकालाबाबत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच, या निकालातून भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालं असून सत्तेतील शिवसेना चौथ्या नंबरवर फेकल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, 225 पैकी 55 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे, म्हणजेच 25 टक्के जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याबद्दल, जनतेचे आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटलं.
आपण जर एकूण मतांची फोड केली तर २२५ पैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्यात. तीन पक्ष एकत्र असूनही उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अडकलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, राज्यात सत्ता असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाली आहे तर भाजप पहिल्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पण, स्वंतत्रपणे विचार केल्यास भाजपला सर्वाधिक जागा जिंकता आल्या आहेत.
भाजपला २३ जागा
जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये, ४६ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या ८५ पैकी काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.