वसई : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठवले आहेत, तर दुसरीकडे गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे अशोक शेट्टी पक्षातील बेदिलीला कंटाळून बहुजन विकास आघाडीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ज़िप. आणि पं.सं निवडणुकीसाठी उमेदवार मिळणे मुश्कील झाले आहे. वसईतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात पक्षांतराची लाट येण्याची शक्यता आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर खचलेला काँग्रेस पक्ष अधिकच खचत चालला आहे. २ दिवसांपूर्वी तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे काँगे्रस अध्यक्ष दामू शिंगडा व त्यांच्या समर्थकांनी आपापले राजीनामे पक्षाच्या वरिष्ठांना पाठवून दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा प्रचंड नाराज होते. काँगे्रस पक्षाच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना माघार घ्यायला लावून काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी बहुजन विकास आघाडीला पालघर लोकसभा मतदारसंघ आंदण दिला. त्यामुळे नाराज झालेल्या जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा यांनी आपला मुलगा सचिन शिंगडा यास रिंगणात उतरवले. अखेरच्या क्षणी पक्षाच्या वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर शिंगडा यांनी माघार घेतली. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे कार्यकर्ते बिथरले व त्यांनी नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीमध्ये काँगे्रस पक्षाला रामराम ठोकला. दीड महिन्यापूर्वी पालघर येथे झालेल्या काँगे्रस कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रचंड वादंग झाला होता. या वेळी पालघर येथे विधानसभा लढवणारे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली असून जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागण्याची शक्यता आहे. सध्या काँगे्रस पक्षाकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे निवडणुका लढवणे पक्षाला शक्य होणार नाही.
जि.प., पंचायत समित्यांसाठी काँग्रेसला उमेदवार मिळणे मुश्किल
By admin | Published: January 12, 2015 10:31 PM