जि.प.ची पोटनिवडणूक लवकरच?
By Admin | Published: April 28, 2015 10:50 PM2015-04-28T22:50:11+5:302015-04-28T22:50:11+5:30
विभाजनानंतर प्रथम झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीवर सर्वपक्षांनी बहिष्कार टाकला.
ठाणे: विभाजनानंतर प्रथम झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीवर सर्वपक्षांनी बहिष्कार टाकला. मात्र, आठ गण आणि आठ गट सोडून अन्य ठिकाणी पोटनिवडणूक घेण्याची तयारी ठाणे जिल्हा प्रशासनाने सुरु केली. त्यातच निवडणूक आयोगाने घेतलेल्या पूर्वतयारी आढाव्यानंतर ही पोटनिवडणूक जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
ठाणे व पालघर दोन जिल्हे स्वतंत्र झाल्यानंतर जानेवारी महिन्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी तर ११० गणांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यावेळी ठाणे जिल्हयातील सर्वपक्षीय नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, मुरबाडमधील ५ पं.समिती गण व १ जि.प. गट अशा ६ जागा बिनविरोध झाली. उर्वरित ३ पं.स.गण व २ जि.प. गटांसाठी झालेल्या निवडणुकीत पाचही ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
याचदरम्यान, उर्वरित जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचे ठरल्यावर जिल्हा प्रशासनाने त्याबाबत तयारी सुरु केली. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त एस.एच. साहरिया यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला. त्याचदरम्यान,जिल्हा परिषदेची पोटनिवडणूकी जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवडयात घोषित होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतकडे वर्तवली आहे. (प्रतिनिधी)