लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्टमर केअरमधून एका अज्ञात आरोपीने क्रेडिट कार्ड सुरू आहे की बंद हे तपासण्यासाठी फोन करून १ लाख २० हजार रुपये ऑनलाईन वळते केले. याप्रकरणी शांतिनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शांतिनगर येथील २७ वर्षीय युवकाकडे एचडीएफसीचे क्रेडिट कार्य होते. त्याला १७ ऑक्टोबर रोजी कस्टमर केअरमधून अज्ञात आरोपीचा फोन आला. आरोपीने युवकाला क्रेडिट कार्ड चालू आहे की बंद हे तपासण्यासाठी मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. आरोपीने डेबिट कार्डचा नंबर विचारून युवकाच्या खात्यातून १ लाख २० हजार रुपये ऑनलाईन वळते केले. या प्रकरणी शांतिनगर पोलिसांनी आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्लॉट खरेदीत १७ लाखाची फसवणूक
एकच प्लॉट दोघांना विकून १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्ते इंद्रप्रीत दलजितसिंग तुली (४५) रा. बैरामजी टाऊन यांनी आरोपी सुनील मेश्राम (४८) रा. आवळेनगर यांच्याकडून नारी रोडवरील बँक कॉलनीत १७ लाख रुपयांचा प्लॉट खरेदी केला होता. परंतु आरोपीने हाच प्लॉट २०१९ मध्ये नगरसेवक मनोज सांगुळे यांना विकल्याचे तक्रारकर्त्यांना माहिती पडले. त्यामुळे इंद्रप्रीत सिंग यांनी आरोपीविरुद्ध कपिलनगर ठाण्यात तक्रार दाखल केली.
अशीच फसवणुकीची घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी धीरेंद्र सुरेंद्र बारलिंगे (७०) खरे टाऊन याने धनंजय मधुकर लुले यांच्यासोबत मौजा लेंड्रा येथे एका भूखंडाचा ७० लाख रुपयांत सौदा केला. लुले यांनी ॲग्रीमेंट करून आरोपीला ३१ लाख रुपये दिले. आरोपीने तोच प्लॉट दुसऱ्याला विकला. याप्रकरणी धनंजय लुले यांनी सीताबर्डी पोलीसात तक्रार दाखल केली.