लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पावधीत दीडपट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून अगरबत्तीच्या व्यवसायात रक्कम गुंतवणाऱ्या अनेक जणांची रक्कम एका जोडगोळीने हडप केली. ममता मडके आणि प्रमोद खेरडे (दोघेही रा. उदयनगर, मानेवाडा) अशी आरोपींची नावे आहेत.
सारिका ऊर्फ नलिनी अनिल ठाकरे (वय ३४) गिट्टीखदानमधील बोरगावला राहतात. आरोपी ममता आणि प्रमोदने ठाकरे तसेच २१ जणांना जीबीएस युनिकॉर्न अगरबत्तीच्या व्यवसायात प्रत्येकी १०,५०० रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. अल्पावधीतच तुम्हाला दीडपट रक्कम मिळेल, असे आरोपींनी सांगितल्यावरून या सर्वांनी त्यांच्याकडे ९ जानेवारी ते ३० जुलै दरम्यान रक्कम गुंतविली. या सर्वांनी नंतर इतरांना रक्कम गुंतवण्यास सांगितले. कुणी रोख, कुणी फोन पे तर कुणी गुगल पेवरून आरोपींकडे रक्कम दिली. नमूद मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले असता आरोपी टाळाटाळ करू लागले. तुम्ही आमच्याकडे नव्हे तर जीबीएस युनिकॉर्न कंपनीत गुंतवणूक केली आहे. कंपनी रक्कम परत देत नाही तर आम्ही काय करावे, असा प्रश्न विचारून आरोपी आपला पदर झटकू लागले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून सोमवारी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अशीही फंडेबाजी
आरोपी ममता आणि प्रमोदने अशा प्रकारे आणखीही अनेक भागात अनेकांना गंडविले असावे, असा अंदाज आहे. रक्कम गुंतविण्यासाठी ते ग्राहकांना सरळसोपी पद्धत सांगायचे. तुम्ही १० हजार रुपये गुंतवा, तुम्हाला २० हजारांच्या अगरबत्ती दिल्या जातील. चार-आठ दिवसातच माल विका अन् दुप्पट रक्कम कमवा. तुम्ही प्रत्यक्ष विकू शकत नसाल तर तुम्हाला सेल्स गर्ल, सेल्स मॅन उपलब्ध करून दिले जाईल. पाच-सात हजार रुपये महिना त्यांना द्या आणि तुम्ही लाखोंचा नफा कमवा, असा फंडाही ते रक्कम गुंतविणारास सांगत होते. प्रत्यक्षात मालाचा दर्जा चांगला नसल्याने ग्राहकच मिळत नव्हते. त्यामुळे नफा सोडा मुद्दलही वसूल होत नव्हते.