नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.
मार्च व एप्रिल महिन्यांत कोरोनाचे संक्रमण प्रचंड वाढले होते. जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी लक्षात घेता सरकारने ५०, १५ आणि ५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली होती. जिल्हा परिषद, कोषागार कार्यालयांनी वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊनसुद्धा लावले होते. सोबतच अभ्यागतांचे प्रवेश बंद करण्यात आले होते. सिव्हिल लाईन परिसरातील दिवसभर सुरू असलेली सरकारी कर्मचाऱ्यांची वर्दळ मंदावली होती; पण कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत गेले आणि सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती वाढत गेली. आता कार्यालयांमध्ये अभ्यागतांचीही उपस्थिती वाढली आहे. कर्मचारी अधिकारी पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. मंगळवारी सिव्हिल लाईन परिसरात कार्यालय सुरू झाल्याने चांगलीच वर्दळ दिसून आली. वाहनांची संख्या परिसरात वाढलेली होती. सरकारी कार्यालयांत १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. सरकारी कार्यालये पुन्हा गजबजलेली दिसून आली.
- महिला कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
काही महिला कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोनाचा प्रभाव संपला नसल्याने घरातील लहान मुले व वडीलधाऱ्या माणसांबद्दल चिंता व्यक्त करून शासकीय कर्मचाऱ्यांची ३० जूनपर्यंत उपस्थिती ५० टक्के ठेवण्याची भावना व्यक्त केली.
- कर्मचारी संघटनांनी दाखविली सकारात्मकता
कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जुनी प्रलंबित कामे निकाली काढणे, जनतेची कामे, खरीप हंगाम, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, विकासकामांचे नियोजन व अर्थचक्र सुरू राहण्यासाठी कार्यालयांमद्ये कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक आहे.
-डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना