लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.लॉकडाऊन लागल्यापासून पुणे, मुंबईसह हैदराबाद व इतर राज्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी पलायन सुरू केले. ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने तर कुणी पायीच आपल्या गावाकडे निघाले. प्रचंड हाल सहन करीत हे मजूर मार्गक्रमण करीत असून हे पलायन अद्याप थांबलेले नाही. अनेक मजूर वर्धा महामार्गावरून नागपूरकडे येत आहेत. या मजुरांच्या सुविधेसाठी अनेक संघटनांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. पांजरा नाक्यावरही अशीच जेवण, पादत्राणे, मास्क आणि आवश्यक वस्तूंची व्यवस्था केली आहे. शिवाय या ठिकाणाहून पायी आलेल्या मजुरांना वेगवेगळ्या वाहनाने त्यांच्या राज्यपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत होत आहे. दरम्यान शहरात अडकलेल्या या मजूर, विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडे नेण्यासाठी एसटी महामंडळाने गणेशपेठ स्थानकावरून बसेस सुरू केल्या. पांजरा नाक्यावर मोठ्या प्रमाणात मजूर गोळा होत असल्याची बाब लक्षात घेत या ठिकाणाहून ११ मे पासून बसेस सुरू करण्यात आल्या.या प्रवाशांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार झारखंड या राज्याच्या सीमेवर सोडण्यात येत आहे. महामंडळाच्या महिला अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली. गुरुवारी प्रति बस २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जवळपास १०० बसेस सोडण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य तपासणीची व्यवस्था या नाक्यावर केली आहे. दरम्यान बंगाल, हिमाचल, दिल्ली ते काश्मीर पर्यंतच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गाड्या सुरू केल्या आहेत. या राज्यातील जमा झालेल्या प्रवाशांना सिटी बसमार्फत रेल्वे स्थानकावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.गरोदर महिलेला रुग्णवाहिकेने पोहचविलेदरम्यान पांजरा नाक्यावर रुग्णवाहिका ठेवण्यात आलेली आहे. गुरुवारी पतीसह या नाक्यावर पोहचलेली पल्लवी बळीराम कांबळे या महिलेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. ही २० वर्षीय महिला ७ महिन्याची गरोदर असून पुण्यात कंपनीत काम करणाऱ्या पतीसह राहत होती. गुरुवारी ट्रकवर बसून हे दाम्पत्य सहकारी दाम्पत्यसह नागपूरला पोहचले होते. त्यांना गडचिरोलीला जायचे होते. तिची स्थिती लक्षात घेता सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.अनेक तासापासून ताटकळतदरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मजुरांना त्यांच्या सीमेपर्यंत पोहचण्याची व्यवस्था होत असली तरी त्यापुढे बिहार, बंगाल, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक तास ताटकळत राहावे लागत आहे. काही लोक मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत जात आहेत व पुढला प्रवास करीत आहेत. मात्र पुढच्या प्रवासाचा भरवसा नसल्याने अनेकजण थांबले आहेत.
नागपुरातील पांजरा नाक्यावरून सोडल्या १०० बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 2:12 AM