लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिरंगा ध्वज पाहून देशभक्ती, एकतेची भावना मनात जागृत होते. त्यामुळे देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर भव्य तिरंगा ध्वज उभारण्यात यावा, अशी विनंती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी चार महिन्यांपूर्वी रेल्वे बोर्डाला केली होती. त्यांची विनंती रेल्वे बोर्डाने मान्य करून देशभरातील ए १ दर्जाच्या रेल्वेस्थानकावर १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी चार महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपवर रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांना देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर भव्य तिरंगा ध्वज उभारण्याची विनंती केली होती. तिरंगा ध्वज पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा वेळी तिरंगा ध्वज पाहून त्यांच्या मनात एकतेची भावना जागृत होऊन ते एकमेकांना मदत करणे, रेल्वेस्थानक, परिसरात घाण न पसरविणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सजग राहतील, अशी सतीजा यांची यामागील भावना होती. सतीजा यांच्या विनंतीनुसार रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी देशभरातील ए १ दर्जाच्या रेल्वेस्थानकावर १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा ध्वज लावण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र रेल्वेच्या सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना रेल्वे बोर्डाने पाठविले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात असलेल्या उद्यानाच्या मधोमध ४५ बाय ३० फुटांचा तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा रेल्वे बोर्डाचा मानस आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असून लवकरच १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा ध्वज नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना पाहावयास मिळणार आहे.देशभक्तीची भावना जागृत होईल‘तिरंगा ध्वज पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. दिल्लीला गेल्यानंतर कॅनाट प्लेस येथे भव्य तिरंगा पाहून असा तिरंगा देशातील मोठमोठ्या रेल्वेस्थानकावर उभारावा, असा विचार मनात आला. त्यानुसार रेल्वे बोर्डाला विनंती केली. रेल्वे बोर्डाने या विनंतीला मंजुरी दिल्यामुळे आता देशभरातील ए १ दर्जाच्या रेल्वेस्थानकावर भव्य १०० फूट उंचीचा तिरंगा उभारण्यात येईल.’ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे, नागपूर विभाग