१,०१४ उद्योगांना तीन वर्षापासून वीजजोडणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:46 AM2020-10-06T11:46:59+5:302020-10-06T12:05:13+5:30
Electricity, Industry, Nagpur News उद्योगांनी मैत्री पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी या उद्योगांनी मागणी नोंदविली होती. मात्र महावितरणकडून जोडण्या मिळाल्याच नाही.
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील १ हजार १४ उद्योग मागील तीन वर्षांपासून विद्युत जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. उद्योगांना वाव देण्याचे राज्य सरकारकडून वारंवार सांगितले जात असतानाही राज्यात ही परिस्थिती आहे. एक खिडकीमधून सर्व कामे होतील, असे सांगण्यात आले असले तरी, परिस्थिती वेगळी आहे.
या सर्व उद्योगांनी मैत्री पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी या उद्योगांनी मागणी नोंदविली होती. मात्र महावितरणकडून जोडण्या मिळाल्याच नाही. या विषयावरील तक्रारी वाढल्यावर महावितरण कंपनी आता कुठे जागी झाली आहे. अर्जदारांना टेलिफोनवरून कॉल केला जात आहे. जोडणी न मिळाल्याने आता अन्य माध्यमातून वीज घेत असल्याचे बहुतेक उद्योगांनी सांगितले आहे. काहींनी जुन्याच जोडण्यांवर लोड वाढवून काम सुरू केले. मात्र विद्युत वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. जोडण्या न वाटण्यात आल्याची पोर्टलवरील माहिती अपुरी आहे. प्रत्यक्षात उद्योगांनी अर्ज केले, मात्र आवश्यक ती कागदपत्रे अपलोड न केल्याने जोडण्या देण्यात आल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कपात अभियंत्यांच्या वेतनातून?
महावितरणने हा विषय आता गंभीरपणे घेतला आहे. कंपनीचे जॉइंट एम.डी. डॉ. नरेश गीते म्हणाले, पोर्टलवर अर्ज करूनही जोडण्या न दिल्याने महावितरणचे एक प्रकारे नुकसानच झाले आहे. ही नुकसान भरपाई संबंधित अभियंत्यांच्या वेतनातून कपात करायला हवी.