विदर्भ-मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्प वर्षभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 07:49 PM2018-08-31T19:49:14+5:302018-08-31T19:51:24+5:30
महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी मंजूर झाले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आपण कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी मंजूर झाले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आपण कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
वानाडोंगरी हिंगणा येथील वाय. सी. सी. ई. कॅम्पसमधील दत्ता मेघे सभागृहात नाबार्डतर्फे (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’ या जलसंवर्धनासाठीच्या मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहिमेच्या जनजागृतीसाठी एका ‘व्हॅन’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक यू. डी. शिरसाळकर, नाबार्डच्या उपव्यवस्थापक उषामणी प्रामुख्याने उपस्थित होते.
वर्धा येथील तामसवाडामध्ये ९ कि. मी. लांबीच्या चेकडॅममुळे व तामसवाड्याच्या नाला खोलीकरणामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध झाले असून या प्रकारचे २१ प्रकल्प आपण वर्धा जिल्ह्यात राबवत आहोत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात जलसंवर्धनासाठी ‘ब्रीज-कम-बंधारे’ १७० ठिकाणी बांधण्यात येणार असून त्यातील तीन बंधारे हे लातूरला बांधले जातील, असेही सांगितले.
लुप्त झालेली कमळगंगा नदी पुन्हा प्रवाहित
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाले, तलाव यांच्या खोलीकरणातून मिळालेल्या माती व मुरुमाचा वापर करण्याचे निर्देश आपण दिले, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधील कमळगंगा ही लुप्त झालेली नदी खोलीकरण व रुंदीकरणामुळे पुन्हा प्रवाहित झाली व २० कि.मी. रुंदही झाली. त्यामुळे या परिसरातील पाण्याची क्षमता वाढून शेती समृद्ध झाली असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.