लसीकरण केंद्रांतील ११०० कंत्राटी कर्मचारी बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:58+5:302021-07-14T04:10:58+5:30
मेहा शर्मा नागपूर : महानगरपालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रांमधील ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा तीन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वीच समाप्त करण्यात आली ...
मेहा शर्मा
नागपूर : महानगरपालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रांमधील ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा तीन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वीच समाप्त करण्यात आली आहे. या कठीण काळात रोजगार हिरावला गेल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे.
बदलाव मुव्हमेंटचे संस्थापक यश गौरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वॉर्डबॉय व केअर टेकर्सचा समावेश आहे. त्यांची १५ ते २५ हजार रुपये मासिक वेतनावर नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना ७०० रुपये रोजीनुसार काम करण्यास सांगण्यात आले आहे. मनपा त्यांना कामाच्या दिवसानुसार वेतन देणार आहे. त्याविरुद्ध ५०० कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली याचिका महापौर दयाशंकर तिवारी यांना सादर करण्यात आली आहे. त्यांनी या प्रश्नावर येत्या पाच दिवसांत आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
यासंदर्भात महापौर तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, काही विशिष्ट वर्गातील कर्मचाऱ्यांची आता गरज नसून त्यात फार्मासिस्ट, वॉर्डबॉय व केअर टेकर्सचा समावेश असल्याची माहिती दिली. या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. परंतु, इतर कर्मचाऱ्यांना नियमित पद्धतीने वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे संशयाचे काहीच कारण नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बेरोजगार झालेले कर्मचारी मंगळवारी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत.